वयाच्या ४४ व्या वर्षी तिने सांगितले कटू सत्य; आठ वर्षे सख्ख्या भावानेच केले शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2022 07:52 PM2022-09-20T19:52:44+5:302022-09-20T19:53:17+5:30
Amravati News बालवयात झालेला अत्याचार एका महिलेने वयाच्या ४४ वर्षी जगासमोर आणला. तिच्या सख्ख्या भावानेच तिच्यावर आठ वर्षे अत्याचार केला होता.
अमरावती : ती सध्या ४४ वर्षांची. सुखवस्तू कुटुंबातील. पती व तरुण मुलासह दिल्लीजवळच्या नोएडा येथे राहणाऱ्या तिने काही वर्षांपूर्वी आमिर खानची ‘सत्यमेव जयते’ सिरीज पाहिली. लगोलग एका सिनेतारकेचे ‘मीटू’ प्रकरणदेखील गाजले. माध्यमांमुळे ते घराघरात चर्चिले गेले. ते पाहून, वाचून ‘ती’ हादरली. आपल्यावरदेखील बालपणी सख्ख्या भावाकडूनच तब्बल आठ वर्षे लैंगिक अत्याचार झाल्याचा पट तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. ती बेचैन झाली. अलीकडे तर त्या विचाराने तिला ‘पॅनिक अटॅक’ आले. अखेर त्या छळ मालिकेच्या ३१ वर्षांनंतर तिने अमरावतीचे राजापेठ पोलीस ठाणे गाठले.
तत्पूर्वी, पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी त्या महिलेच्या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत गुन्हा नोंदवून घेण्याचे आदेश दिले. बरहुकूम, राजापेठ पोलिसांनी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी पीडिताच्या मालाड मुंबईस्थित ५२ वर्षीय भावाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, याप्रकरणी पीडिताने दिल्लीच्या राष्ट्रीय महिला आयोगासह नोएडा पोलीस ठाण्यातदेखील तक्रार दाखल केली. पीडिता ही पाच वर्षांची असल्यापासून अर्थात १९८३ ते १९९१ या कालावधीत लैंगिक शोषणाची ती मालिका अमरावतीमधील राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील एका नागरी वसाहतीत घडली.
काय आहे तक्रारीत
पीडिताचे नोकरदार वडील अमरावती येथे पत्नी, दोन मुली व मुलासह वास्तव्यास होते. पीडिता ही पाच वर्षांची असल्यापासून १९८३ पासून पुढील आठ वर्षे तिचे मोठ्या भावानेच शोषण केले. याबाबत तिने आईवडिलांना सांगितले. मात्र, घराची इभ्रत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून त्यांनी फारसी दखल घेतली नाही. पीडिताला भावाविरुद्ध कडक कार्यवाही अपेक्षित होती. मात्र, आई-वडिलांचा विचार करून तिने ते विष पचवले. काही काळानंतर पीडिता व तिच्या भावाचे लग्न झाले. वडील दगावले. तर आईची प्रकृती बिघडली. त्यामुळेदेखील तिला चकार शब्दही काढता आला नाही.
कुटुंबीयांनी घेतले समजून, दिले बळ
तिच्या डोक्यात ते विचारचक्र घुमत असल्याने ती विमनस्क राहू लागली. त्यामुळे पुढे घडलेला प्रकार तिच्या पतीसह कुटुंबीयांना माहिती पडला. त्यांनी तिला सहकार्याचा हात देत, तिला उभे राहण्याचे बळ दिले. पीडिताच्या मुलाला कळल्यानंतर त्याने आईला आधारच दिला. जे काही झाले, ते तुझ्या अजाणत्या वयात, मात्र आरोपी तर सुजाण होता ना, असा सवाल उपस्थित झाला. दरम्यान, या सर्व प्रकाराला वाचा फोडण्यासाठी ती भावाविरुद्ध सोशल मीडियावर व्यक्तदेखील झाली. मात्र, आरोपी भावावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही.
मानसिक आघात, आरोग्यावर दुष्परिणाम
आरोपीने बालपणी वारंवार शारीरिक जबरदस्ती केल्याने तिच्यावर प्रचंड मानसिक आघात झाला. तिला पॅनिक अटॅक येऊ लागले. विचार करून तिचे आरोग्य बिघडले. कुटुंब संपूर्णपणे पाठीशी असले तरी अपराधीपणाच्या भावनेने ती खचून गेली आहे. त्या सर्व बाबींचा, छळमालिकेचा आपल्याला खूप त्रास होत असल्याने आपण आता तक्रार करत आहोत, त्याच्याविरुद्ध अटकेची कार्यवाही करण्याची साद तिने पोलिसांना घातली. सहायक पोलीस निरीक्षक प्रशाली काळे यांनी तिची तक्रार नोंदवून घेतली.