अमरावती विभागातील १८ शाळांमध्ये अटल टिंकरिंग लॅब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2018 05:29 PM2018-01-07T17:29:50+5:302018-01-07T17:30:10+5:30
नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅब या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा, यामध्ये राज्यातील ११६ शाळांचा समावेश करण्यात आला आहे.
जितेंद्र दखने
अमरावती : नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या अटल टिंकरिंग लॅब या अभिनव योजनेच्या दुस-या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा, यामध्ये राज्यातील ११६ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. अमरावती विभागातील १८ शाळांपैकी सहा अमरावती जिल्ह्यातील आहेत.
मुलांना विज्ञानाची गोडी लागून जिज्ञासा वाढावी व त्यांनी उपकरणे तयार करून संशोधनास प्रवृत्त व्हावे, या हेतूने अटल टिंकरिंग लॅब शाळांमध्ये उभारण्यात येत आहेत. वैज्ञानिक साधने व विविध उपकरणे यासाठी नीती आयोगाकडून निधी दिला जातो. देशातील ३८८ जिल्हे व ७९ स्मार्ट शहरांतील २ हजार ४३२२ शाळांचा अंतर्भाव या योजनेत करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात मागील वर्षी देशभरातील ९२८ शाळांचा या योजनेत समावेश झाला होता. यामध्ये राज्यातील ७५ शाळांचा समावेश होता. नीती आयोगाने जाहीर केलेल्या दुसºया टप्प्यात राज्यातील ११६ शाळांचा समावेश झाला आहे. त्यामुळे एकूण १९१ शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
विद्यार्थ्यांना वैज्ञानिक तंत्रज्ञानाची गोडी
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व ग्रामीण या विषयातील नव्या संकल्पना रुजविणे आणि कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी निवड झालेल्या प्रत्येक शाळांना २० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
जिल्हानिहाय शाळा
अमरावती - ०६
अकोला - ०१
बुलडाणा - ०४
वाशिम - ०४
यवतमाळ - ०३
---------------------------
एकूण - १८