कलिंगड उत्पादकांत चिंतेचे वातावरण; मेहनत। खर्च निघेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:10 AM2021-04-29T04:10:40+5:302021-04-29T04:10:40+5:30
किशोर मोकलकर - आसेगाव पूर्णा : कोरोना महामारीचे संकट, त्यात अवकाळी पाऊस पडल्याने यावर्षी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
किशोर मोकलकर - आसेगाव पूर्णा : कोरोना महामारीचे संकट, त्यात अवकाळी पाऊस पडल्याने यावर्षी सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याही परिस्थितीत स्वत:ला सावरत तालुक्यातील शेतकऱ्यांनी कलिंगड शेती केली. पीकही बहरून आले. मात्र या पिकाला तालुक्यात बाजारपेठ उपलब्ध नाही. तसेच मालाच्या साठवणुकीसाठी गोडाऊन उपलब्ध नसल्याचा फायदा व्यापारी उठवत आहेत. त्यातच कोरोनाने परत डोके वर काढले व पुन्हा लॉक डाऊन लागल्यामुळे व्यापारी शेतकर्यांना भीती दाखवत माल खरेदीसाठी येतच नाहीत. यामुळे बहरून आलेले कलिंगडाचे उत्पादन कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ येथील शेतकर्यांवर आली आहे.
अचलपूर तालुक्यात सोयाबीन खालोखाल कडधान्याचे उत्पादन घेतले जाते. यामध्ये वाल, तूर, मूग, तीळ, उडीद, मटकी, चवळी आदी रब्बी पिके घेतली जातात. परंतु यावर्षी हवामान बदलाचा फटका रब्बी पिकांना बसल्याने ही पीकेही शेतकर्यांच्या हातून गेलेलीच आहेत. यातून सावरण्यासाठी कर्ज काढून भाजीपाला, कलिंगड, पपई ही फळशेती करण्याचा प्रयत्न करून सोयाबीन, रब्बी पिकातून झालेली हानी भरून काढण्याचा प्रयत्न येथील शेतकरी करून पाहत होता. कलिंगडचे पीकही बहरून आले आहे. मात्र खरेदी करणारे व्यापारी लॉक डाऊनमुळे फिरकतच नसल्याने मातीमोल किमतीत कलिंगडाची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याने बळीराजा मात्र आर्थिक संकटात सापडला आहे. निसर्गाचा लहरीपणा व कोरोना महामारीचे संकट यावर मात करून येथील शेतकर्यांनी कलिंगडाची उत्तम शेती केली आहे. पीकही बहरून आले आहे. मात्र योग्य दराने विक्री होत नसल्याची खंत येथील शेतकरी सतीश जवंजाळ यांनी व्यक्त केली.