दोन पोलीस कर्मचारी अधीक्षक कार्यालयाला संलग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:32 PM2018-06-24T22:32:18+5:302018-06-24T22:32:57+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या झाडाझडतीत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील धीरज पाटणकर व शिवचरण बडगे या दोन कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळल्याने त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाला संलग्न करण्यात आले, तर एसडीपीओ सुनील जायभाये यांची भोकरदन येथे बदली झाल्याचे वृत्त आले आहे. या घडामोडींना १४ जून रोजी झालेल्या एसीबीच्या कारवाईची किनार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या झाडाझडतीत येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील धीरज पाटणकर व शिवचरण बडगे या दोन कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळल्याने त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाला संलग्न करण्यात आले, तर एसडीपीओ सुनील जायभाये यांची भोकरदन येथे बदली झाल्याचे वृत्त आले आहे. या घडामोडींना १४ जून रोजी झालेल्या एसीबीच्या कारवाईची किनार आहे.
लाचलुचपतप्रकरणी अंजनगाव सुर्जी एसडीपीओ कार्यालयातील दोन आरटीपीसी २७ आॅक्टोबर २०१७ व १४ जून २०१८ रोजी गजाआड गेले. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी कार्यालयाची झाडाझडती घेतली. धीरज पाटणकर, शिवचरण बडगे हे कामात कसूर करीत असल्याचे निदर्शनास येताच अविनाश कुमार यांनी त्यांना तात्काळ ग्रामीण पोलीस मुख्यालयी हजर राहण्याचे आदेश दिले.
दरम्यान, आरटीपीसी सचिन भोसले याला एसीबीने ताब्यात घेतल्यानंतर एसडीपीओ सुनील जायभाये यांनी लगबगीने जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात वरिष्ठ पातळीवरून बदली करून घेतल्याची चर्चा पोलीस विभागात रंगत आहे. याप्रकरणी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केल्याचे लाचखोर सचिन भोसलेने बयानात म्हटले आहे.
चारित्र्य पडताळणीसाठीही पैशांची मागणी
अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात पासपोर्टकरिता आवश्यक चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी पेसै मागितल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक, पासपोर्ट कार्यालय, एसीबी यांच्याकडे निमखेड बाजार येथील एका तरुणाने केली आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने २५०० रुपये मागितल्याचे तक्रारीत नमूद आहे.