संत्र्यावर ‘कोळशी’चा अटॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:14 AM2020-12-31T04:14:39+5:302020-12-31T04:14:39+5:30
अमरावती : जिल्ह्यात संत्रा फळपिकावर काळ्या माशीचा प्रादुर्भाव जालेला आहे. या कोळशीच्या संकटामुळे संत्र्याच्या पानांवर काळ्या बुरशीची ...
अमरावती : जिल्ह्यात संत्रा फळपिकावर काळ्या माशीचा प्रादुर्भाव जालेला आहे. या कोळशीच्या संकटामुळे संत्र्याच्या पानांवर काळ्या बुरशीची वाढ होत आहे. वेळीच व्यवस्थापन न केल्यास संत्राबागांचे नुकसान होणार आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातीळ संत्रा बगीच्यांमध्ये झाडांना हस्त बहाराची नवी नवती फुटलेली आहे. या नवीन नवती व मध्यम परिपक्व पानांवर रस शोषण करणाऱ्या काळी माशीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. काळ्या माश्यांचे प्रौढ व पिल्ले कोवळ्या पानांतील अन्न रसाचे शोषण करतात व शरीरातून मधासारखे चिकट गोड पदार्थ उत्सर्जित करतात व त्यावर काळ्या बुरशीची पानांवर झपाट्याने वाढ होते. या बुरशीमुळे संपूर्ण बाग काळीशार दिसते, यालाच कोळशी असे म्हणतात. कोळशीमुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. किडीद्वारे रस शोषलेली झाडे दुर्बल होतात व पुढील बहरात फळधारणा कमी होते. सध्याच्या स्थितीमध्ये काळ्या माश्यांचे प्रौढ व अंडी पानांच्या खालच्या बाजूस आढळून आलेली आहेत. यासाठी कृषी विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत. या रासायनिक औषधांची फवारणी करून काळ्या माशीचा प्रादुर्भाव रोखता येत असल्याने या उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.
बॉक्स
ही फवारणी महत्त्वाची
या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नियंत्रणासाठी ईमिडाक्लोप्रीड १७.८ एसएल @ ०.५ मिली किंवा थायोमेथॉक्झाम २५ डब्लूजी @ ०.३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. प्रौढ उत्पत्ती व पन्नास टक्के अंडी उबण्याची स्थिती ही फवारणीकरिता योग्य वेळ असते. कारण या अवधीत किडीच्या प्रथमावस्था झाडांवर उपलब्ध असतात. कोळशी (काळी बुरशी) या रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सी क्लोराईड (COC) ०.३ टक्के @ ३ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.