जिल्हा बँक निवडणूक वाद चिघळला : माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या घरावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 12:41 PM2021-10-08T12:41:52+5:302021-10-08T12:58:01+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा वाद आता चांगलाच पेटला असून भविष्यातही त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री बच्चु कडू व माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी जिल्हा ढवळून निघाला आहे.
अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील निकालाचे पडसाद जिल्ह्यात उमटू लागले आहे. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या चांदूर रेल्वे येथील घरावर गुरुवारी दगडफेक करण्यात आली. त्यांच्या पुतळ्याचे दहन करीत असताना पेट्रोलचाही वापर करण्यात आला. मात्र, हल्ला करून पळण्याच्या बेतात असलेल्या हल्लेखोरांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
दरम्यान, हा हल्ला राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप वीरेंद्र जगताप यांनी केला, तर आईच्या नावे शिवीगाळ केल्यामुळेच प्रहारच्या कार्यकर्त्यानी तीव्र निषेध नोंदविला. मात्र, खोटी तक्रार करून वीरेंद्र जगताप यांनी हल्ल्याचे नाट्य घडवून आणल्याचा पलटवार बच्चू कडू यांनी केला आहे.
व्हिडीओ व्हायरल
जिल्हा बँक निवडणुकीत विजयानंतर वीरेंद्र जगताप यांनी ढोल वाजवत बच्चू कडू यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात आंदोलन केले होते. गुरुवारी सकाळी वीरेंद्र जगताप यांच्या निवासस्थानापुढे १० ते १२ कार्यकर्ते दोन गाड्यांमध्ये धडकले. जगताप यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत घरावर दगडफेक केली.
दरम्यान जगताप बाहेर येताच हल्लेखोरांनी पळ काढला. मात्र, त्यांच्या पाठलाग करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्लेखोरांना पकडले. माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध गुन्हे दाखल करीत आरोपींना अटक केली.