गारपिटीमुळे संत्र्यावर बुरशीजन्य रोगाचा अटॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2022 09:30 PM2022-01-01T21:30:23+5:302022-01-01T21:30:58+5:30
अमरावती जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे संत्रा, लिंबू व मोसंबीच्या बागांचे नुकसान झाले आहे. यामुळे झाडाच्या फांद्या व खोडावरील सालीला जखमा झाल्याने त्यातून बुरशीजन्य रोगांचे संक्रमण होण्याची शक्यता आहे.
अमरावती : जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे संत्रा, लिंबू व मोसंबीच्या बागांचे नुकसान झाले आहे. यामुळे झाडाच्या फांद्या व खोडावरील सालीला जखमा झाल्याने त्यातून बुरशीजन्य रोगांचे संक्रमण होण्याची शक्यता आहे. वेळीच नियोजन न केल्यास नुकसान होण्याची भीती आहे.
यामध्ये फायप्टोप्थोरा, कोलेटोट्रिकम, डिप्लोडीया, ऑल्टरनारिया, यासारख्या बुरशी यामधून शिरकाव करतात. पानांना मार लागल्याने ती फाटतात व गळतात ही. त्यामुळे सूर्यप्रकाशात अन्नद्रव्य तयार करण्याची प्रक्रिया मंदावते. याशिवाय ताण न बसल्याने आंबिया बहराच्या फुटीवर असर होतो. याकरिता मोडलेल्या फांद्या आरीच्या साहायाने कापाव्यात व त्या भागावर बोर्डो पेस्ट लावावी. गारपीटग्रस्त झाडाचे बुंध्यास ही एक मीटर उंचीपर्यंत ही पेस्ट लावावी.
झाडाची साल फाटली असल्यास १ टक्के पोटॅशियम परमॅगनेट द्रावणाने स्वच्छ पुसून घ्यावी. त्यावर बोर्डो पेस्ट लावावी.
झाडाची मुळे उघडी पडली असल्यास वाफ्यामध्ये सायमोक्सनिल अधिक मंकोजेब किंवा मेटलॲक्सिल अधिक मंकोजेब या बुरशीनाशकांची २.५ ग्रॅ प्रति लिटर ८ ते १० लिटर प्रति झाड या प्रमाणात टाकावे असे डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ योगेश इंगळे यांनी सांगितले.
या बुरशीनाशकांची करावी फवारणी
गारपीटग्रस्त झाडावर कॉपर ॲक्सिक्लोराईड किंंवा बोर्डो मिश्रण या बुरशीनाशकांची फवारणी करावी. गारपीटग्रस्त झाडांना खते देऊन अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. त्याकरिता झाडास १ किलो अमोनियम सल्फेट प्रति झाड याप्रमाणे द्यावे. शक्य असल्यास चिलेटेड स्वरुपातील सूक्ष्म अन्नद्रव्याची ०.२ टक्के या प्रमाणात फवारणी करावी, असे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले.