मेळघाटातील आदिवासींच्या शेतावर केसाळ अळीचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:28+5:302021-06-30T04:09:28+5:30

आदिवासी शेतकऱ्यांवर नवे संकट, उगवलेले पीक फस्त चिखलदरा : पंधरा दिवसांपूर्वीच पेरणी केलेल्या मेळघाटातील आदिवासीच्या शेतातील सोयाबीन ...

Attack of hairy larvae on tribal farms in Melghat | मेळघाटातील आदिवासींच्या शेतावर केसाळ अळीचा हल्ला

मेळघाटातील आदिवासींच्या शेतावर केसाळ अळीचा हल्ला

Next

आदिवासी शेतकऱ्यांवर नवे संकट, उगवलेले पीक फस्त

चिखलदरा : पंधरा दिवसांपूर्वीच पेरणी केलेल्या मेळघाटातील आदिवासीच्या शेतातील सोयाबीन पिकावर लाखोंच्या संख्येने केसाळ अळी हल्ला करून ते पीक फस्त करीत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उघडकीस आला. तालुक्यातील टेम्ब्रुसोंडा परिसराच्या आठ ते दहा गावांतील आदिवासी शेतकरी यामुळे हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील धरमडोह, बहादरपूर, आकी, मोरगडसह इतर आदिवासी पाड्यांमधील शेतात केसाळ अळ्यांनी पेरणी केलेले शेत फस्त करायला सुरुवात केली आहे. मेळघाटातील जंगल भागात शेतजमीन असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी शेतकऱ्यांवर हे संकट घोंगावत आहे. लाखो रुपयांचे नुकसान यातून होत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. परिसरात १३ जूननंतर पेरणीला सुरुवात झाली. उगवलेल्या सोयाबीनची पाहणी करताना आदिवासींना धक्का बसला. कारण लाखोच्या संख्येने शेतात केसाळ अळीचा प्रादुर्भाव झाला होता. माणिक गणाजी बेलसरे, बाबूलाल बापू दहीकर, भांबू दहीकर, प्रकाश जामकर, रामलाल जामकर, हिरालाल दहीकर, गायना दहीकर व इतरही शेतकऱ्यांच्या शेतात केसाळ अळी (स्थानिक भाषेत कंबलकीडा) झाल्याचे दिसून आले असल्याची माहिती पंचायत समितीचे सभापती बन्‍सी जामकर यांनी ‘लोकमत’ला दिली.

बॉक्स

तहसीलदार, कृषी विभागाला माहिती

तहसीलदार माया माने व तालुका कृषी अधिकारी विजय पाठोडे यांना बन्‍सी जामकर यांनी माहिती दिली. त्यावरून मंगळवारी कृषिसहायक गणेश तोटे यांनी प्रकाश जामकर व इतर शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. तलाठ्यांमार्फत महसूल विभाग पाहणी करणार असल्याचे सांगण्यात आले.

कोट

धरमडोह, बहादरपूर परिसरातील गावांमध्ये सोयाबीन पिकावर केसाळ अळीने आक्रमण केले आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली.

बन्सी जामकर, सभापती, पंचायत समिती, चिखलदरा

कोट

टेंब्रुसोंडा परिसरात काही शेतांवर केसाळ अळीचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती मिळाली आहे. कृषी विभागाच्या चमूला पाठविण्यात आले आहे.

- विजय पाठोळे, तालुका कृषी अधिकारी, चिखलदरा

Web Title: Attack of hairy larvae on tribal farms in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.