दारूबंदीसाठी हल्लाबोल

By admin | Published: July 12, 2017 12:16 AM2017-07-12T00:16:38+5:302017-07-12T00:16:38+5:30

तालुक्यातील शिवणी, नांदगाव, येवती येथे धाडसत्र राबवून महिलांनी रणचंडिकेचे रूप धारण करीत ४९५ पिंप दारू पाच दिवसांत उद्ध्वस्त केली.

Attack for pistol | दारूबंदीसाठी हल्लाबोल

दारूबंदीसाठी हल्लाबोल

Next

पाच दिवसांत ४९५ पिंप उद्ध्वस्त : ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त, महिलांचा पुढाकार
मनोज मानतकर। लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील शिवणी, नांदगाव, येवती येथे धाडसत्र राबवून महिलांनी रणचंडिकेचे रूप धारण करीत ४९५ पिंप दारू पाच दिवसांत उद्ध्वस्त केली. या कारवाईत ६७ हजारांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. दारूबंदीसाठी स्त्रियांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्यसाठी महिला ठाणेदारांनी घेतलेला पुढाकार यशस्वी होत असल्याचे दिसत आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने हायवेवरील बिअरबार, वाईन शॉप बंद झाल्याने गावठी दारू विक्रेत्यांना उधाण आले असून खेडोपाडी जणू काही दारूचा महापूर वाहत असल्याचे चित्र निर्माण झाल्याने गावठी दारूला लगाम लावण्यासाठी नांदगावच्या महिला ठाणेदार रीता उईके यांच्या मार्गदर्शनात महिलांनी पुढाकार घ्यावा, अशी भूमिका घेत जनजागृती सुरू केली होती.
तालुक्यातील अनेक खेड्यांमध्ये गावठी दारूमुळे शांतता भंग पावत असून वातावरण दूषित झाले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने याला आळा घालण्यासाठी नांदगावच्या ठाणेदार रीता उईके यांनी शिवणी गावात महिलांची बैठक घेतली व दारूबंदीसाठी महिलांना एकजूट करून आठवडाभरात शेकडो पिंप गावठी दारू उद्ध्वस्त केली. हजारो रुपयांचा मुद्देमालही नांदगावातील ओंकारखेडा परिसरातील पारधी बेड्यावरून जप्त केला. शिवणीतील महिलांनी ठाणेदारांसमवेत परिसरातील नदीलगतच्या तसेच गावानजीकच्या गावठी दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्यात. त्यामुळे दारूविक्रेते धास्तावले असून गावठी दारू काढण्यासाठी दारूविक्रेते वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरत आहेत.
दारूबंदी विरोधातील महिला रात्रंदिवस गाठवी दारू काढण्याच्या स्थळांचा शोध घेत असल्याने दारूविक्रेत्यांचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरत आहे. दारूबंदीसाठी शिवणीतील महिलांनी एल्गार पुकारला असून सीता मरगडे, उज्ज्वला देशमुख, मीरा शेंडे, छबू कापडे, मंगला बुरे, महानंदा बुरे, कुसूम मारबदे, कुसूम मेश्राम, सुनंदा पंचबुद्धे, बेबी केवट, शोभा तऱ्हेकर, पुष्पा मेश्राम, इंदिरा शेंडे, पंचफुला शिंदे यांच्यासह शेकडो महिला दारूबंदी होण्यासाठी आक्रमक झाल्या आहेत.

शिवणीत होणार दारूबंदीचा ठराव
शासनाने शेतकरीहितार्थ निर्णय घ्यावा, यासाठी ज्या शिवणी गावातून आंदोलनाची ठिणगी पेटली, त्याच गावातून आता दारूबंदीसाठी महिला आक्रमक झाल्या आहेत व लवकरच दारूबंदीचा ठरावसुद्धा ग्रामपंचायत घेणार असल्याचे सरपंच मधुकर कोठाळे यांनी सांगितले.

महिलांची साथ लाभल्यास अवैधरीत्या सुरू असलेली गावठी दारू पूर्णपणे बंद होणे शक्य होईल. कारण पोलीस प्रशासन तर आपले कार्य करीतच आहे. परंतु, आपले संसार उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी महिलांनीसुद्धा पुढाकार घेणे गरजेचे आहे.
- रीता उईके, ठाणेदार

Web Title: Attack for pistol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.