लेकरासह ‘ती’चा रेल्वेसमोर झोकून देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:10 AM2021-07-02T04:10:32+5:302021-07-02T04:10:32+5:30
अमरावती : वार गुरुवार. वेळ सायंकाळी ७ च्या सुमाराची. स्थळ अमरावतीस्थित रेल्वेस्थानकावरील उड्डाणपूल. ती लेकरासह रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देण्याच्या ...
अमरावती : वार गुरुवार. वेळ सायंकाळी ७ च्या सुमाराची. स्थळ अमरावतीस्थित रेल्वेस्थानकावरील उड्डाणपूल. ती लेकरासह रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देण्याच्या मानसिकतेत. ती जशी उडी घेणार, तसेच तिला तिचे लेकरू बिलगले. अजाणत्या वयातही त्याला संकटाची जाणीव झाली की काय, मात्र, ते मायला घट्ट बिलगले. त्याचवेळी वरून रेल्वेचा नजारा पाहणाऱ्यांच्याही ही बाब लक्षात आली. त्यांनी तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. सुमारे अर्धा तास या कल्लोळात निघून गेला. त्या लेकराच्या रुदनाने व उपस्थितांच्या माणुसकीमुळे तिचे प्राण वाचले. त्याचे झाले असे, की गुरुवार, १ जुलै रोजी ६५ दिवसांच्या खंडानंतर अमरावती मुंबई ही ‘अंबा एक्सप्रेस’ सुटणार असल्याने अमरावती रेल्वे स्थानकांवर मोठी रेलचेल होती. अनेक दिवसांनंतर ही गाडी सुटत असल्याने बघ्यांनीदेखील गर्दी केली होती. प्रवाशांची ये-जा सुरू असताना उपस्थितांनी एकच गलका केला. ‘वाचवा, धावा, रेल्वे थांबवा, चेन ओढा, असा कल्लोळ झाला.
रेल्वे पुलावरून एक तिशीतील महिला उडी घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे लक्षात आले. त्या महिलेसोबत तिचे अदमासे ५ वर्षांचे लेकरूदेखील होते. ती उडी घेण्याच्या प्रयत्नात असताना तो तिला घट्ट बिलगला. पुलावरील लोकदेखील तिला थांबवण्याचा प्रयत्न करीत होते. गस्तीवर असलेले पोलीसदेखील पोहोचले. त्यांनी त्या महिलेची समजूत काढली. महत्प्रयासानंतर तिने उडी घेण्याचा निर्णय मागे घेतला. अन् सर्वांचा जीव भांड्यात पडला.
हद्द कुणाची?
या घटनेबाबत शहर कोतवाली पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला नाही. अशी कुठलीही घटना आपल्या हद्दीत घडली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर, त्या महिलेने उडी घेतली असती, तर ते प्रकरण रेल्वे पोलिसांच्या अखत्यारित आले असते, असे रेल्वे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे हद्द कुणाची, हा प्रश्न निर्माण झाला.