बनावट दस्तऐवजांव्दारे भूखंड विक्रीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:07 AM2021-01-24T04:07:01+5:302021-01-24T04:07:01+5:30
अमरावती : बनावट दस्तऐवजांव्दारे एका महिलेच्या नावे असलेला भूखंड हडपून विक्रीचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ...
अमरावती : बनावट दस्तऐवजांव्दारे एका महिलेच्या नावे असलेला भूखंड हडपून विक्रीचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधार शैलेंद्र गंगाधर नवाथे (५६, रा. नवाथे प्लॉट) सह दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदविला.
नागपूर स्थित सिव्हिल लाईन येथील रहिवासी माधवी मुधकर शिरभाते (६५) यांनी १९ मे १९८० रोजी बडनेरा शेत सर्व्हे क्रमांक ३६/१ व३८/१ मधील अकृषक झालेला ५,९२० चौरस फूट भूखंड क्रमांक १ दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी करून खरेदी केला होता. तेव्हापासून सदर भूखंडाचा ताबा माधवी शिरभाते यांच्याकडेच होता. दरम्यान शैलेंद्र नवाथे याने साथीदारांच्या मदतीने शिरभाते यांच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार केले. माधवी शिरभाते यांच्या जागेवर दुय्यम निबंधक कार्यालयात अन्य एका महिलेस उभे करून सदर भूखंडाचे खोटे विक्रीपत्र नोंदणीकृत केले. त्यानंतर वर्तमानपत्रात जाहिरात देऊन सदर भूखंड विक्रीचा प्रयत्न केला. ही बाब माधवी शिरभाते यांच्या लक्षात येताच त्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून आरोपी शैलेंद्र नवाथेसह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्यवे गुन्हा नोंदविला.