आरोपी शिवकुमारला घेरण्याचा, मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:13 AM2021-03-28T04:13:47+5:302021-03-28T04:13:47+5:30
कॉमन साठी धारणी : महिला वनाधिकारी कर्मचारी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालय परिसरात धाव घेतली. तेथे आरएफओ शुभांगी डेहनकर, वनपाल ...
कॉमन साठी
धारणी : महिला वनाधिकारी कर्मचारी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी न्यायालय परिसरात धाव घेतली. तेथे आरएफओ शुभांगी डेहनकर, वनपाल प्रियंका येवतकर व वनरक्षक अनिता बेलसरे, भाजपच्या क्षमा चौकसे यांनी आरोपीला घेरण्याचा, मारण्याचा प्रयत्न केला. त्या प्रचंड संतप्त होत्या. दीपाली चव्हाणसारखी डॅशिंग अधिकारी आत्महत्या करते, तेथे वनरक्षक, वनपालाच्या जिवाचे मोल तरी काय, अशी संतप्त भावना व्यक्त करीत महिलांच्या गर्दीतील अनेक हात आरोपी शिवकुमारकडे मारण्यासाठी, त्याला घेरण्यासाठी वळले. मात्र, पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला.
दरम्यान, मेळघाटचे उपविभागीय पोलीस संजय काळे यांनी आरोपीला दिवाणी फौजदारी न्यायालयासमोर उभे केल्यानंतर त्यांनी ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीची मागणी केली. दीपाली चव्हाण यांनी आरोपी शिवकुमारच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची सुसाईड नोटमध्ये सांगितले. ही माहिती आरोपीला होताच तो पळून गेला होता. त्याला नागपूर रेल्वे स्थानकाहून अटक केल्यानंतर आरोपीने तपास कामी कोणतेही सहकार्य केले नाही. त्याने दीपाली चव्हाण यांना दिलेल्या नोटीस, कार्यालयीन रेकार्ड, लॅपटाॅप, मोबाईल, दैनंदिन डायरी आदी तपासकामी जमा करायचे आहेत. पीसीआर मिळाला नाही, तर तो पुरावे नष्ट केला जाईल. त्यामुळे त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी एसडीपीओंनी केली. २७ व २८ तारखेची रात्र शिवकुमारला धारणी पोलीस ठाण्यातील कोठडीत काढावी लागणार आहे.
बचावपक्षाकडूनही युक्तिवाद
वकील सुशील मिश्रा यांनी विनोद शिवकुमारची बाजू मांडली. त्यामध्ये त्यांनी उपविभागीय अधिकारी यांनी मागितलेल्या तीन दिवसांच्या पोलीस कोठडीला विरोध करीत, घटनास्थळी जाण्याचे काम नाही, आरोपीकडील साहित्य जमा करण्याकरिता फक्त एकच दिवस लागतो. त्यामुळे तीन दिवस पीसीआर न देता फक्त एक दिवसाचा पीसीआर देण्यात यावा, असे म्हटले. न्यायालयाने ही मागणी फेटाळली.
कोट
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, प्रथम वर्ग न्यायाधीशांनी त्याला २९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
संजय काळे, एसडीपीओ, मेळघाट
कोट २
पोलिसांना विनोद शिवकुमारला पायी न्यायालयात नेण्याची मागणी केली. पण , पोलिसांनी नकार दिला. आम्ही महिला कर्मचाऱ्यांनी विरोध केला. आम्हाला बाजूला सारून त्याला वाहनात बसवून न्यायालयात नेले. या प्रकरणात विनोद शिवकुमारसह श्रीनिवास रेड्डीदेखील तेवढेच दोषी आहेत. त्यांनी दखल घेतली असती, तर दीपालीने आत्महत्या केली नसती. तिची आत्महत्या नसून, तिच्या पोटच्या गोळ्यासह दोघांची हत्या या अधिकाऱ्यांनी केली आहे.
- शुभांगी डेहनकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, सुसर्दा
------