आंदोलन भडकविण्याचा प्रयत्न, माजी कृषिमंत्र्यांसह पाच जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:13 AM2021-03-14T04:13:26+5:302021-03-14T04:13:26+5:30

अमरावती : एमपीएसीच्या परीक्षा शासनाने रद्द ठरविल्याने संतापलेल्या विद्यार्थांनी पंचवटी चौकात गुरुवारी आंदोलन छेडले. मात्र, या ठिकाणी भाजपच्या काही ...

Attempts to provoke agitation, crimes against five including former agriculture minister | आंदोलन भडकविण्याचा प्रयत्न, माजी कृषिमंत्र्यांसह पाच जणांवर गुन्हे

आंदोलन भडकविण्याचा प्रयत्न, माजी कृषिमंत्र्यांसह पाच जणांवर गुन्हे

Next

अमरावती : एमपीएसीच्या परीक्षा शासनाने रद्द ठरविल्याने संतापलेल्या विद्यार्थांनी पंचवटी चौकात गुरुवारी आंदोलन छेडले. मात्र, या ठिकाणी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थांना चिथावणी देऊन शासनाविरुद्ध आंदोलन भडकविण्याचा प्रयत्न करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याचा प्रयत्न केला. तसेच माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी आंदोलनस्थळी ठाणेदारांशी हुज्जत घालून तुम्ही सरकारचे कुत्रे आहात, असे वक्तव्य केल्यामुळे बोंडेसह पाच जणांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी विविध कलमान्वये शुक्रवारी गुन्हे नोंदविले.

पोेलीससूत्रानुसार, माजी कृषिमंत्री अनिल बोंडे, एक महिला, बादल कुलकर्णी, महापालिका शिक्षण सभापती प्रणित सोनी, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तायडेविरुद्ध गाडगेनगर पोलिसांनी भादंविचे कलम २२५, १८६, १८८, १८९, २६९, २७०, २७१, २९१, १०९ सहकलम २, ३, ४ साथीचे रोग अधिनियम सहकलम ५१ ब आपत्ती व्यवस्थापन अधिनियम सहलकम ११०, ११२ महाराष्ट्र पोलीस कायदानुसार गुन्हा नोंदविला. याप्रकरणी फिर्यादी गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी पोलिसांतर्फ तक्रार नोंदविली.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी शासकीय तंत्रनिकेतन ते पंचवटी चौक येथे पोहचून चौकाच्या मध्यभागी बसले व चारही बाजूंनी वाहतूक त्यांनी रोखून धरल्याची माहिती ठाणेदार चोरमले यांना मिळाली.

१४ मार्च रोजी होऊ घातलेली एमपीएसीची परीक्षा शासनाने रद्द ठरविल्यामुळे विद्यार्थांनी चौकात नारेबाजी सुरू होती. ठाणेदार चोरमले यांनी विद्यार्थ्यांना चौकातून हटवण्याविषयी विनंती केली. मात्र, तेथे भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी प्रणित सोनी व बादल कुुलकर्णी हे हजर होते. त्यांनी आंदोलक विद्यार्थांना चिथावणी देत शासनाविरुद्ध भडकविण्याचा आणि कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा इरादा पोलिसांच्या निदर्शनास येताच ठाणेदार चोरमले यांनी वायरलेसवरून आरसीपी, क्युआरटी व एसआरपीएफचे पथक तात्काळ बोलावून अनुचित घटना घडू नये, म्हणून कलम ६८ अन्वये सायंकाळी विद्यार्थांना ताब्यात घेत वाहनात बसविले. विद्यार्थिनींना दामिनी पथकाव्दारे ताब्यात घेतले. मात्र, अनिल बोंडे यांनी आंदोलनस्थळी पोहचून ठाणेदार व पोलिसांशी हुज्जत घातली. ते एवढ्यावरच न थांबता तुम्ही सरकारचे कुत्रे आहात, असे म्हटले. त्यांचा आंदोलनस्थळी काहीही संबंध नसताना डिटेन विद्यार्थांना व्हॅनमध्ये ठेवले असताना त्यांनी बोंडे यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांची बाचाबाची करून आम्हाला शाहनपणा शिकवू नका कोरोनाने मरण्यापेक्षा आंदोलन करून मेलेले बरे असे मीडियासमोरसुद्धा वक्तव्य केले. अनिल बोंडे व विद्यार्थांना डिटेन करून पोलीस आयुक्तालयात नेले असता, तेथे विद्यार्थांना सोडत असताना भाजपाच्या एका महिला पदाधिकारी व प्रवीण तायडे यांनी चोरमले यांना उद्देशून हे वलगाव ठाणे नसून गाडगेनगर असल्याची धमकी दिली. संचारबंदी असतानाही आरोपींनी शासनाविरोधात आंदोलन भडकविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय यादव व पीएसआय मनीषा सामटकर करीत आहेत.

Web Title: Attempts to provoke agitation, crimes against five including former agriculture minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.