राष्ट्रीय हायस्कूलच्या १३ संस्थाचालकांची पोलिसांपुढे हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:08 AM2020-12-28T04:08:15+5:302020-12-28T04:08:15+5:30
परतवाडा : अचलपूर येथील राष्ट्रीय हायस्कूलच्या १३ संस्थाचालक-पदाधिकाऱ्यांना अचलपूर न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. या जामिनानंतर त्या सर्वांनी अचलपूर ...
परतवाडा : अचलपूर येथील राष्ट्रीय हायस्कूलच्या १३ संस्थाचालक-पदाधिकाऱ्यांना अचलपूर न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. या जामिनानंतर त्या सर्वांनी अचलपूर पोलीस ठाण्यात हजेरी लावली.
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये सहायक लेखाधिकाऱ्यांनी १० डिसेंबरला अचलपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्याध्यापकांसह संस्थाचालकांविरुद्ध भादंवि कलम ४२०, ४६४, ४६५, ४६८, ४७१ व ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. तक्रारीच्या अनुषंगाने शिवाजी गोहत्रे (रा. कोळविहीर, ता. मोर्शी) याला त्याने अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र लावल्यानंतरही पूर्णवेळ शिक्षक म्हणून नियुक्ती दिल्याचा ठपका या सर्वांवर ठेवला गेला आहे.
व्होकेशनल विभागात इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी विषयाकरिता ही नियुक्ती केली गेली. या नियुक्तीच्या अनुषंगाने मुलाखतीदरम्यान व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाचा प्रतिनिधीही हजर होता. मुलाखतीदरम्यान या प्रतिनिधीने त्या उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व अनुभव प्रमाणपत्रही तपासले होते. पुढे शिवाजी गोहत्रे यास नियुक्ती दिल्यानंतर मान्यतेकरिता आवश्यक प्रस्ताव जिल्हा व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाकडे शाळेकडून पाठविला गेला. याला संबंधित अधिकाऱ्यांनी मान्यता नाकारली. संबंधित शिक्षकाचे अनुभवाचे प्रमाणपत्र खोटे असल्याचे कळविले. यावर शाळेने त्या शिक्षकाकडून स्पष्टीकरण मागविण्याकरिता त्याला पत्र दिले. पण, तेव्हापासून हा शिक्षक शाळेकडे फिरकलाच नाही. अखेर संस्था (शाळा) ने त्यास कामावरून कमी केले. नियुक्त रद्द केल्याचे, कामावरून कमी केल्याचे आदेश स्पीड पोस्टने त्या शिक्षकास पाठविण्यात आले आहेत. या शिक्षकाच्या नियुक्तीनंतर शाळेने शासनाकडून, संबंधित विभागाकडून कुठलेही वेतन काढलेले नाही. ही नियुक्ती करण्यापूर्वी त्या पदभरती प्रक्रियेकरिता शासनस्तरावरून मान्यता घेण्यात आली आहे, तर नियुक्तीनंतर मान्यता नाकारल्यामुळे संबंधित शिक्षक शिवाजी गोहत्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती.
दरम्यान, गोहत्रे यांनी जोडलेले अनुभवाचे प्रमाणपत्र खोटे व दिशाभूल करणारे ठरल्यावरून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाकडून गोहत्रे यांची नियुक्ती रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत. दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने जिल्हा न्यायाधीश क्र. २ यांच्या न्यायालयात जामिनाकरिता संस्थेच्या पदाधिकारी व संचालकांनी प्रकरण दाखल केले. यादरम्यान प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायाधीश क्र. १ कडे वकील दीपक वाधवानी यांनी पार पाडली. यावर जिल्हा न्यायाधीश ए. ए. सईद यांनी या प्रकरणात संबंधितांना २३ डिसेंबरला अंतरिम जामीन मंजूर केला. या अंतरिम जामिनानंतर त्या संस्थाचालकांसह पदाधिकाऱ्यांनी २४ डिसेंबरला अचलपूर पोलिसांपुढे हजेरी लावली.