नववी ते बारावी शाळांमध्ये १६ टक्केच उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:10 AM2021-01-10T04:10:05+5:302021-01-10T04:10:05+5:30
७४९ पैकी ६६२ शाळा सुरू, कोरोना संसर्गाची पालकांत भीती, लसीनंतर मुलांना पाठविण्याचा निर्धार अमरावती : शासनाने २३ नोव्हेंबर २०२० ...
७४९ पैकी ६६२ शाळा सुरू, कोरोना संसर्गाची पालकांत भीती, लसीनंतर मुलांना पाठविण्याचा निर्धार
अमरावती : शासनाने २३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू केल्यात. मात्र, २ जानेवारीपर्यंत शाळांमध्ये १६.०६ टक्केच विद्यार्थी उपस्थितीची नोंद आहे. एकूण १,३९,९०२ पटसंख्येच्या २२,४६६ एवढेच विद्यार्थी शाळेत ऑफलाईन शिक्षण घेत आहेत. परंतु, आतापर्यंत एकही विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आलेला नाही.
शाळा प्रारंभ करण्यापूर्वी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी झाली. यात ४७ शिक्षक आणि ७ शिक्षकेतर कर्मचारी संक्रमित आढळून आले. कोरोना नियमावलींचे पालन करीत शाळांमध्ये विद्यार्थ्यांना अध्ययन केले जात आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दिवसाआड शाळांमध्ये वर्गात बोलाविले जाते.
गर्दी होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत आहे. मात्र, शहरी भागात अद्यापही पालकांच्या मनातून कोरोनाची भीती गेलेली नाही. परिणामी शहरी शाळांमध्ये उपस्थिती फारच कमी आहे. हल्ली ग्रामीण भागात ऑफलाईन शिक्षणाला पसंती, तर शहरी भागात ऑनलाईन शिक्षणाला विद्यार्थी प्राधान्य देत आहे. शाळांत मुलांना मास्कचा वापर, हात नियमित धुणे आणि शारीरिक अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
----------------------
नववी ते बारावीपर्यंतच्या शाळांचा दृष्टिक्षेप
- एकूण विद्यार्थी : १३९९०२
- एकूण शाळा : ७४९
- शाळा सुरु : ६६२
- विद्यार्थी उपस्थिती: २२४६६
- एकूण शिक्षक: ५४५७
- शिक्षकेत्तर कर्मचारी : २२८७
- संक्रमित शिक्षक : ४७
- संक्रमित शिक्षकेत्तर कर्मचारी : ०७
--------------------------------
तालुकानिहाय विद्यार्थ्यांची उपस्थिती
अमरावती : १००९
भातकुली : ८२४
दर्यापूर: २०५६
अंजनगाव सुर्जी : ५८८
अचलपूर : २५२९
चांदूर बाजार : १२७१
चिखलदरा : २४५
वरूड : २७५६
धारणी : २५१
नांदगाव खंडेश्र्वर : २२४२
चांदूर रेल्वे : ९९२
धामणगाव रेल्वे :१३५८
तिवसा : ८९५
मोर्शी : १९२१
महापालिका : १५२१
----------------------
ग्रामीण भागातील शाळांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन शिक्षणाला प्राधान्य दिले आहे. आतापर्यत एकही विद्यार्थी बाधित आढळून आला नाही, ही जमेची बाजू आहे.
- वामन बोलके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अमरावती.
------------
शिक्षणापेक्षा मुलांचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे लस नाही तर शाळा नाही, अशी भूमिका घेतली आहे. ऑनलाईन शिक्षणाद्धारा अभ्यासक्रम पूर्ण करण्यास प्राधान्य देत आहे.
- प्रगती बांबोडे, पालक, चपराशीपुरा.