विद्यार्थिनीची लग्नाच्या दिवशी तासिकेला दाखविली हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:04+5:302021-05-25T04:14:04+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागप्रमुखांनी एका विद्यार्थिनीची चक्क लग्नाच्या दिवशी तासिकेला उपस्थिती दर्शविल्याची धक्कादायक बाब माहिती ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागप्रमुखांनी एका विद्यार्थिनीची चक्क लग्नाच्या दिवशी तासिकेला उपस्थिती दर्शविल्याची धक्कादायक बाब माहिती अधिकारातून उघडकीस आली. समाजशास्त्र विभागात मर्जीतील प्राध्यापकांना लाभ देण्यासाठी हा अफलातून कारभार करण्यात आला आहे. याप्रकरणी नेट-सेट, पीएच.डी., सीएचबी कृती समितीने कुलगुरूंकडे तक्रार दिली आहे.
सुधीर नागापुरे यांच्या तक्रारीनुसार, विद्यापीठाचे समाजशास्त्र विभागप्रमुख के.बी. नायक यांनी विद्यार्थ्यांची तासिकेला बनावट उपस्थिती दर्शवून मर्जीतील प्राध्यापकांचे मानधन काढले आहे. समाजशास्त्र विभागाचा कारभार मनमानी आणि भोंगळ असल्याबाबत अनेकदा तक्रारी आल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली नाही. एका विद्यार्थिनीची लग्नाच्या दिवशी, तर उच्च न्यायालयात अर्ज सादर करण्यासाठी मुंबई येथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यालाही उपस्थित दर्शवून ‘त्या’ प्राध्यापकांना लाभ देण्याचा प्रताप करण्यात आला. एवढेच नव्हे तर एक प्राध्यापक दिवसभर कार्यक्रमात हजर असताना, त्यांनी तासिका घेतल्याचे भासवून समाजशास्त्र विभागप्रमुखांनी मानधन ओरपले आहे. या विभागाची सखोल चौकशी केल्यास अनेक तथ्य बाहेर येतील, असे नागापुरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
---------------
समाजशास्त्र विभागाबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात चौकशी समिती गठित केली असून, अहवाल मिळताच नियमानुसार दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.