बंदीस्त नक्षल्यांच्या हालचालींवर लक्ष
By admin | Published: April 26, 2017 12:12 AM2017-04-26T00:12:13+5:302017-04-26T00:12:13+5:30
छत्तीसगड, महाराष्ट्रात नक्षलवाद्यांनी घातपाती कारावाया करून प्रशासनाविरुद्ध उठाव चालविला आहे.
तटाला पोलिसांचा पहारा : अंडा बराकीत दोघे जेरबंद
अमरावती : छत्तीसगड, महाराष्ट्रात नक्षलवाद्यांनी घातपाती कारावाया करून प्रशासनाविरुद्ध उठाव चालविला आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या विविध कारागृहात जेरबंद असलेल्या नक्षलवाद्यांवर लक्ष ठेवण्याचा सूचना गृहविभागाने दिल्या आहेत. याच पार्श्वभूमिवर अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त असलेल्या दोन नक्षलवाद्यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तटाला पोलिसांचा पहारा असून कमाण्डोंची रात्र गस्त सुरू झाली आहे.
गत काही दिवसांपूर्वी नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुरक्षेच्या कारणास्तव दोन नक्षलवाद्यांना अमरावती मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. या दोन्ही नक्षलवाद्यांना न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. अतिसुरक्षेच्या कारणांमुळे कारागृह प्रशासनाने या दोन्ही नक्षलवाद्यांना अंडा बराकीत जेरबंद केले आहे. त्यांच्या इत्थंभूत हालचालींवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जात आहे. कारागृह अधीक्षकांच्या दालनात थेट सीसीटीव्ही कॅमेरेची स्क्रिन असल्याने नक्षल चळवळीशी संबंधित असलेल्या या दोन्ही नक्षलवाद्यांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नक्षल चळवळीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय असलेला साईबाबा नागपूर कारागृहात बंदीस्त आहे.
गुप्तचर विभागाचे निर्देश
अमरावती : नागपुरात साईबाबासोबत एम. मित्रा व प्रशांत राही हे सुद्धा जेरबंद आहेत. कारागृहाच्या आत राहून हे नक्षलवादी बाहेर घातपाती कारवाया करू शकतात, अशी माहिती राज्याच्या गुप्तचर विभागाला प्राप्त झाली आहे. बंदीस्त नक्षलवाद्यांच्या सुटकेसाठी अप्रिय घटना घडवून आणणे, शासनाला मागण्या मान्य करण्यासाठी वेठीस धरणे आदी कारस्थाने नक्षलवादी करू शकतात. गुप्तचर विभागाने राज्य शासनाला दिलेल्या माहितीनुसार ज्या कारागृहांमध्ये नक्षलवादी बंदीस्त आहेत, त्या कारागृहांत आतील व बाह्य सुरक्षेत वाढीबाबत अवगत केले. कारागृहांतून नक्षली कारवायांना बळ मिळू नये, यासाठी सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे ठरविले आहे. नागपूर कारागृहातून अन्य ठिकाणी नक्षलवादी हलविले आहे. त्यापैकी दोघे येथील कारागृहात बंदीस्त आहेत.
सुरक्षा रक्षकांचे
जागते रहो
कारागृहाच्या मागील बाजुस तटालगत सुरक्षेसाठी दोन टॉवर आहे. या दोन्ही टॉवरवर बंदूकधारी सुरक्षा रक्षक २४ तास तैणात करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गावरही ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनांवर दुर्बिणीने लक्ष ठेवले जात आहे. नक्षलवादी जेरबंद असल्याच्या पार्श्वभूमिवर कारागृह प्रशासनाने अंतर्गत व बाह्यसुरक्षेत वाढ केल्याचे चित्र आहे.
नागपूर येथून आलेले दोन्ही नक्षलवादी हे अंडा बराकीत बंदीस्त आहेत. त्यांच्या एकूणच हालचालींवर प्रशासन लक्ष ठेवून आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून त्यांच्यावर नजर राहील. तटाच्या बाहेरील सुरक्षेसाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे.
- रमेश कांबळे,
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह