धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणाऱ्या लोकमतच्या ‘अमरावती फाईल्स’ची दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 11:21 AM2022-04-02T11:21:07+5:302022-04-02T11:26:27+5:30
प्रदीप सेमलकर व परिवाराने जातीय सलोखा राखणारे कार्य केल्याचा एक चांगला संदेश समाजापुढे ठेवला.
परतवाडा (अमरावती) : धर्मनिरपेक्षतेचे अनोखे दर्शन घडविणाऱ्या प्रदीप सेमलकर व त्यांच्या कुटुंबीयांचे ‘लोकमत’च्या वृत्तानंतर सर्वत्र कौतुक होत असून, जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘लोकमत’चे कात्रण ट्विटरवर पोस्ट केले आणि ‘अमरावती फाईल्स’ धर्मनिरपेक्षता, सद्भावना व एकोपा देणारे असल्याची पोस्ट केली.
धारणी तालुक्यातील कळमखार येथील दारूल उलूम येथे आयोजित मशवरा कार्यक्रमातून परतणाऱ्या मुस्लीम समुदायाच्या बांधवांना आपल्या घराच्या स्लॅबवर नमाज अदा करण्याची सोय उपलब्ध करून देणे हे धर्मनिरपेक्षतेचे व सलोख्याचे अनोखे दर्शन घडविणारे ठरले. याबाबत मेळघाटातील सेमाडोह (ता. चिखलदरा) निवासी प्रदीप सेमलकर यांच्या परिवाराचे निवासस्थानी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी स्वत: भेट देऊन त्यांचा सत्कार केला व कुटुंबीयांचे अभिनंदन केले.
समाजापुढे आदर्श संदेश
प्रदीप सेमलकर व परिवाराने जातीय सलोखा राखणारे कार्य केल्याचा एक चांगला संदेश समाजापुढे ठेवला. त्याची दखल ‘लोकमत’ने घेतली आणि सर्वच स्तरांवरून कौतुकाची थाप दिली जात असताना अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दखल घेत ट्विट केले. जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी त्याची दखल घेतली. या कुुटुंबाचा सत्कारही करण्यात आला.