वृत्ती बदलली की बदल घडतोच
By admin | Published: November 9, 2016 12:25 AM2016-11-09T00:25:06+5:302016-11-09T00:25:06+5:30
अजाण वयात ज्यांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरविले अशा चिमुकल्यांच्या जीवनात उजेड आणण्याचे काम आशादीप अनाथालय व भूमिपुत्र फाऊंडेशन करीत आहे,...
बच्चू कडू : आशादीप अनाथालयात दीपोत्सव
सुमीत हरकुट चांदूरबाजार
अजाण वयात ज्यांच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरविले अशा चिमुकल्यांच्या जीवनात उजेड आणण्याचे काम आशादीप अनाथालय व भूमिपुत्र फाऊंडेशन करीत आहे, असे प्रतिपादन आ. बच्चू कडू यांनी टोंगलापूर येथील सत्यशोधक बहुउद्देशीय संस्थाद्वारा आयोजित ‘दीपोत्सव पूर्णामायेचा’ कार्यक्रमात केले.
यावेळी अध्यक्षस्थानी आ. बच्चू कडू होते, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी किरण गित्ते, दीपक धोटे व सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ बाळसाहेब दराळे (नासा) हे होते. आ. कडू म्हणाले, मायेचे छात्र हरविलेल्या चिमुकल्यांच्या जीवनातील अंधार हा दरिद्रीचा आहे, अज्ञानाचा आहे तो अंधार दूर करण्याचे कर्तव्य प्रत्येकाचे आहे. त्यामुळे वृत्ती बदलावी लागेल. ती बदलली की बदल घडतो आणि त्यामुळे या अनाथाच्या जीवनातील अंधार कायमचा नष्ट होणार आहे.
सत्यशोधक बहुउद्देशीय शिक्षण संस्थाद्वारा संचालित आशादीप अनाथालय व भूमिपूत्र फाऊंडेशनतर्फे आयोजित पूर्णामायेच्या काठावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी दानदात्यांनी चिमुकल्यांसाठी फटाके, फराळाच्या वस्तू, कपडे आणले होते. स्वत: जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी या अनाथालयातील चिमुकल्यासोबत दिवाळी साजरी केली. त्यामुळे या चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. या चिमुकल्यांनी स्वत: हाताने बनविलेले आकाश दिवे लावण्यात आले होते. या चिमुकल्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याकरिता परतवाडा, अमरावती, चांदूरबाजार येथून अनेक परिवार प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा नयना कडू यांनी प्रास्ताविकात आशादीप अनाथालयाची पार्श्वभूमी प्रस्तुत केली, तर यावेळी सचिव राहुल म्हाला, पल्लवी कडू, सोपान गोडबोले, विनोद जवंजाळ, शरद तायडे, सतीश मोहोड, राजाभाऊ ठाकरे, सुबोध क्षीरसागर, अंकुश जवंजाळ, गजानन ठाकरे आदी शेकडो नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन घोम, आभार प्रदर्शन जवंजाळ यांनी केले.