वरुड तालुक्यात पावसाने दिली ओढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:39+5:302021-07-20T04:10:39+5:30
पिके कोमेजली राजुरा बाजार : कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. परंतु वरूड तालुका अद्याप कोरडाच असल्याने ...
पिके कोमेजली
राजुरा बाजार : कोकणासह, पश्चिम महाराष्ट्रासह उर्वरित महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले. परंतु वरूड तालुका अद्याप कोरडाच असल्याने दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला आहे.
अर्धा जुलै सरला तरी तालुक्यात पावसाचा पत्ता नाही. गेल्या १८ दिवसापासून दमदार पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात आतापर्यंत केवळ २७१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुढील काही दिवसात हलका ते मध्यम सरी येतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तालुक्यातील संत्राबागा, कपाशी, सोयाबीन, हिरवी मिरची पाण्याअभावी पिकांची वाताहात होत आहे. कपाशीचे लहान रोपटे उन्हाच्या तडाख्याने कोमेजून जात आहे.
जून महिन्यात सुरुवातीला पावसाचे दमदार आगमन झाले होते. त्यांनतर मात्र, पावसाने तालुक्यात हुलकावणी दिली. जून महिन्यात २२९ मिलिमीटर तर ११ जुलैपर्यंत केवळ ४२ मिमी पाऊस झाला. तालुक्यातील वाहणारी चुडामनी नदी अद्यापही कोरडी ठण्ण आहे. दिवसा होणाऱ्या असह्य उकाड्याने जीव कासावीस होत आहे. विहिरीतील पाण्याची पातळी जुलै महिना उलटूनही अद्याप वाढलेली नाही. राजुरा बाजार परिमंडळातही आतापर्यंत जेमतेमच पाऊस पडला आहे. असाच पावसाळा राहिला तर धरणातील पाणीसाठा कमी होऊन शहरात तथा तालुक्यात पाणी कपातीची वेळ येऊ शकते.
कोट
संत्राबागांची फळगळ होत असल्याने बुरशीनाशकांची ड्रेन्चिंग (आळवणी) करावयाचे आहे. परंतु जमिनीत ओलावा नसल्याने ते शक्य नसल्याने लांबणीवर पडले आहे.
- अतुल पाटील, संत्रा उत्पादक शेतकरी
गाडेगाव ता. वरुड
पुसला परिमंडळात पर्जन्यमानमापक माझेकडे आहे. मी स्वतः च त्याची नोंद गेल्या तीन वर्षांपासून घेत आहे. यावर्षी जुलै महिन्यात सर्वात नीच्चांकी पाऊस झाला आहे.
- शैलेश वायकुळ, पर्जन्यमापक तथा कापूस पैदासकार शेतकरी,पुसला