दसरा मैदानाचे लक्षवेधक सौंदर्यीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:13 PM2018-11-21T22:13:10+5:302018-11-21T22:13:26+5:30

शहरातील दसरा मैदानाच्या लक्षवेधक सौंदर्यीकरणासह साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या स्मृती जपण्याच्या प्रयत्नाने परतवाडा शहराच्या वैभवात भर पडली आहे.

Attractive beautification of the Dasara Stadium | दसरा मैदानाचे लक्षवेधक सौंदर्यीकरण

दसरा मैदानाचे लक्षवेधक सौंदर्यीकरण

Next
ठळक मुद्देशहराच्या वैभवात भर : साहित्यिक राम शेवाळकर यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरातील दसरा मैदानाच्या लक्षवेधक सौंदर्यीकरणासह साहित्यिक प्रा. राम शेवाळकर यांच्या स्मृती जपण्याच्या प्रयत्नाने परतवाडा शहराच्या वैभवात भर पडली आहे.
शहरातील वाघामाता मंदिर परिसरालगतच्या दसरा मैदानाच्या सौंदर्यीकरण अंतर्गत प्रशस्त व आकर्षक हॉलची निर्मिती करण्यात आली आहे. या सभागृहाला प्रा. राम शेवाळकर यांचे नाव देण्यात आले आहे. यावर साहित्यिक, लेखकांची ओळख म्हणून पेनाची नीपही अंकित केली आहे. सभागृहाचे प्लास्टरिंग आणि पुढील १० ते १२ वर्षे रंग उडणार नाही अशी वैशिष्ट्यपूर्ण रंगरंगोटी केली आहे. प्रा. राम शेवाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हे सभागृह उभारले असून, दसरा मैदानावरील मुख्य प्रवेशद्वारालासुद्धा राम शेवाळकर असे नाव देण्यात आले आहे. अचलपूरच्या भूमीत जन्मलेल्या राम शेवाळकरांच्या स्मृती यातून जपण्याचा प्रयत्न आहे.
मैदानात लोकांना बसण्याकरिता पायऱ्यांची व्यवस्था व त्याच्या बाजूला वाहणारे पाणी आणि लॉन विकसित करण्यात आले आहे. एक खुले व्यासपीठ साकारले आहे. व्यासपीठाचा दोन्ही बाजूला वापर करता येणार असून, समोरील खुल्या जागेत लॉनवर ७०० ते ८०० लोक सहजतेने बसू शकतील. व्यासपीठाला किल्ल्यांच्या प्रवेशद्वाराचा लूक देण्यात आला आहे.
परिसरातच लहान मुलांना खेळण्याकरिता खेळणी आणि वृद्धांना बसण्याकरिता जागा विकसित करण्यात आली आहे. खुल्या जागेत व्यायामाचे साहित्य बसविण्यात आले आहेत. रावण दहनाकरिता स्वतंत्र प्लॅटफॉर्म विकसित करून मैदानाची ओळख कायम ठेवण्यात आली आहे. मॉर्निंग वॉकची सुरक्षित व्यवस्था नागरिकांसाठी या सौंदर्यीकरणातून उपलब्ध झाली आहे.
आ. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून हा परिसर विकसित केला गेला. नगरपालिकेने याकरिता दसरा मैदानाची दीड एकर जागा सार्वजनिक बांधकाम विभागाला उपलब्ध केली. तत्कालीन कार्यकारी अभियंता वा.पा. भावे, चंद्रकांत मेहेत्रे, उपविभागीय अभियंता विजय वाठ, शाखा अभियंता गोपाल बकाले यांच्या मार्गदर्शनात अवधूत कन्स्ट्रक्शनचे अमित देशमुख यांनी हे मैदान विकसित केले. याकरिता वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ३ कोटी ६० लाख खर्च करण्यात आले. येत्या २४ नोव्हेंंबर रोजी याचे लोकार्पण होत आहे. यावेळी शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान होणार आहे.

Web Title: Attractive beautification of the Dasara Stadium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.