हॉटेलमधून आजारांची विक्री सुरूच !
By Admin | Published: October 3, 2016 12:07 AM2016-10-03T00:07:05+5:302016-10-03T00:07:05+5:30
अन्न सुरक्षा मानदे कायद्याने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन शहरात ठिकठिकाणी होताना दिसत आहे.
नियमांची ऐसीतैसी : एफडीए झोपेत, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
संदीप मानकर अमरावती
अन्न सुरक्षा मानदे कायद्याने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन शहरात ठिकठिकाणी होताना दिसत आहे. शहरातील हॉटेलचालक दररोज नागरिकांना आजार विकत आहेत. अमरावतीकरांना नाईलाजास्तव हे आजार विकावे लागत आहेत. पण, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेक हॉटेल्समध्ये पसरलेले घाणीचे साम्राज्य व अन्नपदार्थ शिजविण्याच्या ठिकाणी पसरलेली घाण पाहता हॉटेलचालक अजिबात जबाबदारीने वागत नसल्याचे स्पष्ट होते.
गाडगेनगर परिसरातील एका हॉटलमध्ये शनिवारी अकस्मात भेट दिली असता, अस्वच्छतेचा बाजार उघडकीस आला. अस्वच्छ पाण्यातून कप विसळले जात होते. त्यानंतर ज्या बेसिनमध्ये ते दुबार विसळले जातात त्याच बेसिनमधून ग्राहकांना पिण्याचे पाणीदेखील पुरविले जात होते. असे असताना नागरिकांना किती घाण पाणी पिण्यास भाग पाडले जात असावे, हे स्पष्ट होते. अनावधानाने किंवा नाईलाजास्तव का होईना हे पाणी पोटात गेल्याने नागरिकांना अनेक संक्रमणांचा धोका असतो. याच बेसिनमध्ये हात धुण्याची सोय देखील ग्राहकांसाठी करण्यात आली आहे. पंचवटी ते गाडगेनगर मार्गावर हनुमान मंदिराच्याखालील मार्केटमध्ये हे हॉटेल आहे. या मार्गावर असंख्य विद्यार्थी शिक्षणासाठी भाड्याने राहतात. सकाळचा चहा आणि नाश्त्यासाठी या हॉटेलमध्ये विद्यार्थ्यांना यावे लागते. त्यामुळे येथे विद्यार्थ्यांची सतत गर्दी असते. विद्यार्थ्यांकडून खाद्यपदार्थांचे दरही भरभक्कम घेण्यात येतात. मात्र, त्या तुलनेत स्वच्छता आणि सुविधांना महत्त्व दिले जात नाही.
‘चहासोबत आजार मोफत’ ही वृत्तमालिका यापूर्वी सद्धा ‘लोकमत’ने प्रकाशित केली होती. पण, अन्न व औषधी प्रशासन विभागाद्वारे वरचेवर शहरातील हॉटेल्सच्या नियमित तपासण्या होत नसल्याने हॉटेलचालकांचे मनोबल वाढले आहे. कारवाईची भीती म्हणून त्यांना उरलेली नाही. त्यामुळे आजार आणि संक्रमणाच्या छायेत अमरावतीकर नागरिक वावरत असताना एफडीएचे अधिकारी ़झोपेत आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो.
या हॉटेलमध्ये अन्नपदार्थ तयार करण्याच्या शेगडीवरीही घाण साचली होती. अस्वच्छता व दूषित पाण्यामुळे कावीळ, डायरिया, टायफाईडसारख्या आजारांना सर्रास आमंत्रण दिले जात असल्याचे भयंकर चित्र अंबानगरीत दिसून येत आहे. यावर अंकुश कधी लागणार हाच मोठा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे.
चढे दर घेऊनही नियमांचे पालन का नाही ?
अंबानगरीत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ग्राहकांकडून खाद्यपदार्थांचे चढे दर आकारले जातात. हे दर सामान्य नागरिकांच्या अवाक्या बाहेर असूनही नाईलाजास्तव ग्राहकांना ते खरेदी करावे लागतात. यातून हॉटेलचे संचालक लाखो रुपये कमावतात. परंतु ग्राहकांना उत्तम सेवा देण्यास मात्र ते अपयशी ठरत आहेत. अन्न व औषध प्रशासन (एफडीए)ची नोंदणी किंवा त्यांचा परवाना घेताना ठरवून दिलेल्या नियमांचे कुठलेही पालन न करता ते पायदळी तुडविण्यात येत असल्याचे वास्तव आहे.
एफडीएचे अधिकारी
'नॉट रिचेबल'
कर्तव्याची जाण विसरलेले एफडीएचे अधिकारी थातूर-मातूर कारवाई करून मोकळे होतात. शहरात अन्नासोबत जीवघेण्या आजाराची विक्री होत आहे. मात्र एफडीएचे अधिकारी गप्प का, हा प्रश्नच आहे. यासंदर्भात फोन केला असता सहयक आयुक्त जयंत वाणे व अन्न सुरक्षा अधिकारी विश्वजित शिंदे यांचा मोबाईल 'नॉट रीचेबल' होता.
घाणीच्या ठिकाणी अन्न पदार्थ तयार केल्यास व दूषित पाणी पोटात गेल्यास त्याचे संक्रमण होऊन गॅस्ट्रोयन्टरस्टीस,
क्रोनिक अम्ब्योसीस, पोलीटीस या आजाराची लागण होते. यामुळे पोट दुखणे, अपचन होणे व इतर अनेक आजार बळावतात.
- प्रवीण बिजवे,
जनरल व लेप्रोस्कोपिक सर्जन अमरावती.