भाजप-सेनेतील पैसे वाटपाच्या वादाची 'ऑडिओ क्लिप' व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:15 PM2019-04-29T23:15:21+5:302019-04-29T23:16:45+5:30

निवडणुकीच्या काळात बुथप्रमुख आणि शक्तिकेंद्र प्रमुखाला वाटण्यासाठी दिलेले पैसे पोहोचले नसल्याच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या शिलेदारांमध्ये उडालेल्या शाब्दिक चकमकीच्या एका नव्या 'ऑडिओ क्लिप'ने जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडविली आहे.

'Audio clip' viral of BJP-Sena's money allocation controversy | भाजप-सेनेतील पैसे वाटपाच्या वादाची 'ऑडिओ क्लिप' व्हायरल

भाजप-सेनेतील पैसे वाटपाच्या वादाची 'ऑडिओ क्लिप' व्हायरल

Next
ठळक मुद्देनिवडणूक आयोग गप्प का? : संघाच्या 'फिडबॅक'चाही उल्लेख, पाच हजार प्रत्येकी!

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निवडणुकीच्या काळात बुथप्रमुख आणि शक्तिकेंद्र प्रमुखाला वाटण्यासाठी दिलेले पैसे पोहोचले नसल्याच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या शिलेदारांमध्ये उडालेल्या शाब्दिक चकमकीच्या एका नव्या 'ऑडिओ क्लिप'ने जिल्ह्यात पुन्हा खळबळ उडविली आहे.
यापूर्वी अशाच एका ऑडिओ क्लिपने जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढले होते. त्या क्लिपचे अन्वयार्थ लावले जात असतानाच ही दुसरी क्लिप आली. दोन्ही क्लिपमधील एक आवाज सारखाच असल्यामुळे दोन्ही घटनांमध्ये परस्पर संबंध असल्याचीही शक्यताही वर्तविली जात आहे.
काय आहे क्लिपमध्ये?
निवडणुकीच्या काळातील हे संभाषण असल्याचे त्यातून प्रतित होते. या ध्वनिफितीत दोन आवाज आहेत. एक इसम भाजपकडून आणि दुसरा इसम शिवसेनेकडून बोलतो आहे. भाजपसाठीचा आवाज हा भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या परिचित आवाजाप्रमाणे आहे. शिवसेनेसाठीचा आवाज आणि बोलण्याची शैली मुंबईच्या संस्कृतीशी मेळ घालणारी आहे. या इसमाचा गव्हांदे, असा उल्लेख ध्वनिफितीत ऐकता येतो.
अडीच हजार पहिले, अडीच हजार नंतर
ध्वनिनिफतीनुसार, शिवसेना आणि भाजपच्या बुथप्रमुखाला अडीच हजार रुपये पहिले आणि अडीच हजार रुपये काम झाल्यावर द्यावे, असे नियोजन दोन्ही संवादकर्त्यांचे आहे; तथापि ठरल्याप्रमाणे रक्कम सर्वत्र पोहोचली नसल्याची तक्रार भाजपकडून शिवसेनेच्या गव्हांदे यांना केली जाते. या तक्रारीवर गव्हांदे यांचा स्वर उंचावतो. पैसे वाटण्याची जबाबदारी ज्या आप्पा नामक इसमावर (भाजपसाठी काम करणारा) दिली आहे, तो आप्पा घरी झोपला होता. पूर्ण पैसे आलेले नसतानाही सकाळी दहा वाजता मी भाजपच्या हिस्याचे पैसे उपलब्ध करून दिले. आप्पा मात्र जाणूनबुजून साडेतीन वाजता घरून बाहेर पडतात, याला काय म्हणायचे? टाईमपास? असा कडक सवाल विचारून हे गव्हांदे सदर बाबीची रीतसर तक्रार आपण भाजप कार्यालयात करणार असल्याचा इशारा देतात. या बिंदूपर्यंतच्या संवादात गव्हांदे हे भाजपशी अप्रामाणिकता दर्शवित असल्याचे आणि त्यामुळेच सूर्यवंशी हे काहीसे नरमाईच्या भूमिकेत असल्याचे जाणवते. आप्पाचे तुम्ही जेवढे लाड करता तेवढे कुणीच केले नाही, असा आरोप गव्हांदे भाजपसाठी बोलणाऱ्या इसमावर लावतात. त्या आरोपानंतर समोरील व्यक्तीच्या वाणीचा तोल सुटतो. अशोभनीय भाषेत ते 'गव्हांदे' यांचा उपमर्द करतात. तुम्ही माझे बॉस नाही, तुमच्या बापाच्या जीवावर करतो का आम्ही?, हाकलून देईन तेथून, एका मिनीटात धारणी सोडा, अशा धमक्यांच्या फैरी झडतात.
शक्तिकेंद्र प्रमुखाला वैयक्तिक पैसे
आपण जे पैसे देतो आहेत ते बुथ केंद्रप्रमुखाला देत नाही, ते 'बुथ मॅनेज' करण्यासाठी देत आहोत. शक्तिकेंद्र प्रमुखाला भाजपात वैयक्तिक पैसे दिले जातात, असा उल्लेख या ध्वनिफितीत आहे.
कुठेच काम झालेले नाही
राणीगाव सर्कलचा रिपोर्ट यायचा आहे. इतर ठिकाणचे रिपोर्ट आले. कुुठेच शंभर टक्के काम झालेले नाही. भाजपकडूनही नाही आणि शिवसेनेकडूनही नाही, अशी तक्रार गव्हांदे करीत असल्याचे ऐकता येते.
पैसे अपुरे पडल्याचा फिडबॅक संघाकडून
या संभाषणात संघाचा उल्लेख आहे. खालपर्यंत पैसे नीटपणे पोहोचले नाहीत, असा फिडबॅक संघाकडून आला असल्याचे भाजपकडून बोलणारी व्यक्ती गव्हांदे यांना सांगत आहे. मेळघाट हा ख्रिश्चन मिश्नरींचा बेल्ट आहे. विखुरलेली वस्ती आहे, अशा आशयाचे वर्णन संभाषणात ऐकता येते.
सेना-भाजप सोशल मीडियावर भिडले, एकमेकांना इशारे
व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना आणि भाजपक्षातील समर्थकांमध्ये सोशल मीडियावर सोमवारी भांडण पेटले. भाजप-शिवसेना अमरावती या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर दिनेश सूर्यवंशी यांनी प्रचार यंत्रणा कशी खिळखिळी केली ते ऐका, अशी पोस्ट अपलोड करून यापूर्वीची ऑडिओ क्लिप पोस्ट करण्यात आली आहे. त्याखाली पत्रपरिषदेत सूर्यवंशींचे समर्थन करणारा हाच तो आप्पा ऊर्फ लक्ष्मीकांत पाटील असा उल्लेख आहे. हे लिहिताना झोंबणाऱ्या शब्दाचाही वापर करण्यात आला आहे. त्या शब्दावर आक्षेप नोंदवून भाजपच्या गोटाकडून शिवसेनेचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. त्या विशिष्ठ शब्दावर आक्षेप नोंदवून 'याद राखा!' असा दम भाजपजनांनी शिवसेनेला भरला आहे. भाजप आणि मोदी यांच्यामुळेच तुम्ही निवडून येता, हेदेखील भाजपला सांगण्यास ते विसरले नाही.
सोशल मीडियावर असे शब्दबाण अनेक डागले गेले. दोन्ही पक्षांचे सैनिक एकमेकांच्या दोषांवर वार करण्यासाठी शक्ती एकवटताना दिसत होते. याची मोठी चर्चा जिल्हाभरात सुरू होती.
या दोन पोस्ट चर्चेचा विषय
या धामधुमीत आधीची दोन पोस्ट भाजप-सेनेच्या गोटांत दिवसभर फिरत होत्या.
पहिली पोस्ट शंकरनगरच्या मोतीलाल रघुवंशी यांची आहे. भाजपचा जुना कार्यकर्ता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पैसे वाटपाच्या मुद्यावरून उद्भवलेल्या वादाचा हवाला देऊन दिनेश सूर्यवंशी यांना पदावरून काढावे, अन्यथा प्रयत्नपूर्वक बांधलेल्या मतदारसंघात भाजपक्षाला अपयश मिळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. आप्पा पाटील हे सूर्यवंशी यांचे नातेवाईक असल्याचेही त्यात म्हटले आहे.
दुसरी पोस्ट जगदीश गुप्ता यांच्या समर्थकांची आहे. जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे दोनदा पालकमंत्रीपद भूषविलेल्या गुप्ता यांच्या हाती दिल्यास सर्व मतभेद विसरून कार्यकर्ते कामाला लागतील, असे सुचविणारी आहे.
काय होता पैसे वाटपाचा फॉँँँर्म्युला ?
पैसे वाटपाचा फॉर्म्युला संभाषणात आहे. निम्मे पैसे सेनेला आणि निम्मे पैसे भाजपला द्यावे. भाजपला पैसे देताना शिवसेनेचे लोक उपस्थित असतील आणि शिवसेनेला देताना भाजपचे लोक उपस्थित असतील, असे नियोजन त्यात आहे.

Web Title: 'Audio clip' viral of BJP-Sena's money allocation controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.