वन्यजीव विभागाकडून वाघ, बिबट्याच्या मृत्यूचे होणार ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 08:39 PM2021-09-16T20:39:20+5:302021-09-16T20:39:47+5:30
Amravati News राज्याच्या वन्यजीव विभागाने २०१८ ते २०२१ या तीन वर्षांत दगावलेल्या वाघ, बिबट्याचा अहवाल मागविला आहे. त्यामुळे वन्यजीव, वन विभागाची चमू माहिती गोळा करण्यासाठी धावाधाव करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नैसर्गिक, अपघात, घातपात अथवा शिकारीने गत तीन वर्षांत किती वाघ, बिबट्यांचे मृत्यू झाले, याचे वन्यजीव विभागाकडून ऑडिट सुरू झाले आहे. त्यानुषंगाने राज्याच्या वन्यजीव विभागाने २०१८ ते २०२१ या तीन वर्षांत दगावलेल्या वाघ, बिबट्याचा अहवाल मागविला आहे. त्यामुळे वन्यजीव, वन विभागाची चमू माहिती गोळा करण्यासाठी धावाधाव करीत आहे.
विदर्भात वाघ, बिबट्यांची संख्या वाढली. मात्र, तीन ते चार वर्षांपासून वन्यजीवांच्या मृत्यूच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. विशेषत: वाघ, बिबट्यांच्या मृत्यूने वन्यजीव विभाग हैराण झाला आहे. त्यामुळे सन २०१८-२०१९, २०१९-२०२०, २०२१-२०२२ या तीन वर्षांतील वाघ, बिबट्यांच्या मृत्यूची कारणे शोधण्यात येत आहेत. राज्याचे वनबल प्रमुख पी. साईप्रसाद यांनी नुकताच वनविभागाचे ११ वनवृत्त आणि वन्यजीव विभागाच्या ५ विभाग प्रमुखांशी आभासी पद्धतीने संवाद साधून वाघ, बिबट्याच्या मृत्यूची कारणे आणि त्यामागील भूमिका अहवालाच्या माध्यमातून मागविली आहे. गत काही दिवसांपासून वन विभागात त्याचीच लगबग सुरू झाली आहे.
असा सादर करावा लागेल अहवाल
वाघ, बिबट्याच्या मृत्यूची कारणे देताना त्यामागील वस्तुनिष्ठ अहवाल अनिवार्य आहे. लपवाछपवी झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार आहे. वाघ, बिबट्याचा घातपाती, नैसर्गिक मृत्यू झाल्यास तसे पुरावे द्यावे लागणार आहेत. किंबहुना, शिकार झाल्यास याप्रकरणी आरोपी, गुन्ह्याचे स्वरूप, साहित्य जप्ती, कातडे आदी माहिती पुराव्यानिशी द्यावी लागणार आहे. हा डेटा परीक्षेत्रनिहाय गोळा करण्यात येत आहे.