उमेदवारीत ‘नापास’ प्रचारात ‘प्रामाणिक’
By admin | Published: October 13, 2014 11:16 PM2014-10-13T23:16:15+5:302014-10-13T23:16:15+5:30
'चूल आणि मूल' या जोखडातून बाहेर पडत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राजकारणातील या खालच्या स्तरावर लावला आहे.
अमरावती : 'चूल आणि मूल' या जोखडातून बाहेर पडत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा झेंडा राजकारणातील या खालच्या स्तरावर लावला आहे. मात्र, यापुढील विधानसभा आणि लोकसभा या वरच्या आणि महत्त्वाच्या स्तरावर झेप घेऊ पाहणाऱ्या महिलांना मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येच अडकून ठेवले आहे. आपल्या समाजातील पुरूषी मनोवृत्ती अद्यापही संपली नसल्याचेच हे द्योतक आहे.
राजकीय पक्ष निवडणुकीत उमेदवारीसाठी नापास ठरविणाऱ्या महिलांना प्रत्यक्ष प्रचारात मात्र खात्रीचे प्रचारक म्हणून वावरताना दिसत आहे.
राजकारणाचा पाया असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गाव आणि तालुका पातळीवर सर्व अडचणींना समर्थपणे तोंड देत महिलांनी राजकारण आणि विकासाची सांगड घालत अत्यंत उत्तम कामगिरी बजावली आहे. या कामगिरीच्या बळावर राजकारणात त्यांनी आपले पाय चांगलेच रोवले आहेत. परंतु त्यांच्या वाटा ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेपर्यंत अडकविले गेले आहेत. त्यामुळे विधानसभा आणि लोकसभेतील महिलांचा टक्का वाढायला तयार नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण देऊन त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना सुरूंग लावत कायदे बनविले जाणाऱ्या या दोन्ही सभागृहांपासून महिलांना दूर ठेवण्याचा कुटील डाव पुरूषी महत्त्वाकांक्षेकडून खेळला जात आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत नशीब आजमाविणाऱ्या एकूण १३५ उमेदवारांमध्ये १४ महिलांनाच निवडणुकीच्या आखाड्यात उतरविण्यात आले आहे. त्यापैकी केवळ सात महिलांनाच राजकीय पक्षांची उमेदवारी लाभली आहे. यावरून राजकीय पक्षांमधील महिलांविषयीची कमालीची उदासीनता दिसून येत असल्याचे सिद्ध होते.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात प्रत्यक्ष उमेदवार म्हणून महिलांना उतरविण्यात राजकीय पक्षांचा हवा तेवढा कल नसल्याचे दिसून येते. महिला मतदारांवर डोळा ठेवून प्रचारात मात्र त्यांना आवर्जून गोवले जात आहे. त्यामागेही आकड्यांचे गणित आहे. जिल्ह्यात एकूण साधारणपणे २२ लाख २१ हजार ६२४ मतदार आहेत. यामध्ये महिला १० लाखांच्या वर तर पुरुषांची आकडेवारी ११ लाखांच्या वर आहे. हे लक्षात घेऊन राजकीय व्यूहरचना ठरविण्यात येते. महिलांची उमेदवारी जरी कमी असली तरी महिला मतदारसंख्या पाहता त्यांना प्रचारात सन्मान मिळाले. (प्रतिनिधी)