नव्या ट्रॅकवर वाहनांचे ईन कॅमेरा पासिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:57 AM2018-02-09T00:57:22+5:302018-02-09T00:58:01+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथील प्रादेशिक परिवहन विभागाने नव्या ट्रॅकवर स्वतंत्रपणे वाहनांचे पासिंग सुरू केले आहे. यात ‘ब्रेक टेस्ट’ला प्राधान्य दिले जात आहे. दरदिवशी ४० ते ५० वाहनांचे इनकॅमेरा पासिंग होत आहे.
ऑनलाईन लोकमत
अमरावती: मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथील प्रादेशिक परिवहन विभागाने नव्या ट्रॅकवर स्वतंत्रपणे वाहनांचे पासिंग सुरू केले आहे. यात ‘ब्रेक टेस्ट’ला प्राधान्य दिले जात आहे. दरदिवशी ४० ते ५० वाहनांचे इनकॅमेरा पासिंग होत आहे. त्याकरिता तीन वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आरटीओचे कामकाज पारदर्शक असावे, कामात सुसूत्रता आणि ते अद्ययावत असावे. सामान्यांना सहज कामे करता यावी, ईन कॅमेरा बे्रेक टेस्ट व्हावे, यासाठी पुणे येथील श्रीकांत कर्वे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला १ नोव्हेंबर २०१७ पासून आरटीओंनी स्वतंत्र ट्रॅकवर वाहनांची ब्रेक टेस्ट घ्यावी, असे निर्देश दिले. त्यानुसार वाहनांचे पासिंग, ब्रेक टेस्ट, जुजबी तपासणी महामार्गावर नव्हे, तर स्वतंत्र ट्रॅकवर घेता यावी, यासाठी नजीकच्या अंजनगाव बारी मार्गालगत ८ एकर परिसरात स्वतंत्र ट्रॅक निर्माण केले आहे. येथे ६४ लाख रूपयातून ९८० मीटरचे स्वतंत्र ट्रॅक, संरक्षण कुंपण, वाहन निरीक्षकांसाठी कक्ष, पाणीपुरवठा, वीज कनेक्शनची व्यवस्था आहे. वाहनांसंदर्भात नोंदणी, फिटनेस, ब्रेक टेस्ट, पासिंग आता आरटीओ कार्यालयात नव्हे, नव्या ट्रॅकवर तपासणी केली जात आहे.
लवकरच स्वयंचलित वाहन तपासणी यंत्रणा
केंद्र सरकारच्या वाहतूक नियंत्रण प्रणालीनुसार अमरावती येथे लवकरच स्वयंचलित वाहन तपासणी यंत्रणा कार्यन्वित होणार आहे. त्याकरिता नव्याने १५ कोटी रूपयातून अत्याधुनिक सुसज्ज इमारत साकारली जाणार आहे. नाशिक येथे ही प्रणाली सुरु झाली असून लवकरच अमरावतीत संगणकाद्वारे स्वयंचलित वाहन तपासणी सुरु होईल, असे अतिरिक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोडे यांनी दिली.
नव्या ट्रॅकींगवरील वाहनांच्या कामकाजामुळे वेळेत कामे होत आहे. ईन कॅमेरा वाहनांचे पासिंग होत असल्याने ब्रेक टेस्ट घेताना वाहनात त्रुटी त्वरेने लक्षात येतात. - आर.टी. गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी