अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘उदई’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 07:03 PM2019-07-26T19:03:33+5:302019-07-26T19:06:15+5:30
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवसा बु. येथील रहिवासी प्रकाश चव्हाण यांचे ‘उदई’ आत्मकथन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे.
अमरावती - नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हिवसा बु. येथील रहिवासी प्रकाश चव्हाण यांचे ‘उदई’ आत्मकथन संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. या आत्मकथनाला विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
प्रकाश चव्हाण यांचा जन्म झाला, त्या आदिवासी पारधी समाजात अशिक्षण, दारू, चोऱ्यामाऱ्या आणि रूढीपरंपरेची वाळवी लागली आहे. पारधी समाज आजही बहुतांश त्याच मानसिकतेत जगतो आहे. अशा या शापित समाजातील एक बाप आपल्या मुलाच्या शिक्षणाचा ध्यास धरतो. मुलाच्या शिक्षणासाठी सारे कष्ट झेलतो. मुलाला मात्र शिक्षणाचा तिटकारा आहे. रडतखडत मुलगा दहावीपर्यंत पोचतो.
दहावी नापास झाल्यावर बाप मुलाचे नाव टाकतो. येता-जाता साऱ्यांसमोर मुलाला बोल लावतो. बापाचे हेच वागणे मुलात जिद्द निर्माण करते. मुलगा पदवीधर होतो. शिक्षणाचं महत्त्व समजतो आणि समाजातील लोकांनाही शिक्षणासाठी प्रवृत्त करू लागतो. अशिक्षित आणि दुर्लक्षित समाजातल्या मुला-बापातला हा संघर्ष आणि पारधी जीवनाचं भेदक वास्तव या पुस्तकात आहे. या पुस्तकाचा विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.