श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात स्वयंचलित हवामान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:09 AM2021-05-03T04:09:15+5:302021-05-03T04:09:15+5:30
अमरावती : हवामान बदलामुळे पिकांवर वेळोवेळी संकटे येतात. ही संकटे येण्यापूर्वी परिसरातील हवामानाचा अचूक अंदाज मिळावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे संभाव्य ...
अमरावती : हवामान बदलामुळे पिकांवर वेळोवेळी संकटे येतात. ही संकटे येण्यापूर्वी परिसरातील हवामानाचा अचूक अंदाज मिळावा, जेणेकरून शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळू शकतील, याकरिता श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालयात स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना करण्यात आली.
केंद्राचे उद्घाटन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते महाराष्ट्रदिनी झाले. संस्थेचे सचिव शेषराव खाडे, प्राचार्य शशांक देशमुख, हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख शेखर बंड यांची उपस्थिती होती.
स्कायमेट कंपनीद्वारे स्थापित या स्वयंचलित हवामान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाच्या अचूक अंदाजासोबत वायूचा वेग, वायूची दिशा, जमिनीतील तापमान, जमिनीतील आर्द्रता, जमिनीतील ओलावा, सूर्याचे विकिरण अशा अनेक बाबींची माहिती विविध प्रकारच्या सेन्सरद्वारे मिळणार आहे. भविष्यात ॲपची निर्मिती करण्यात येणार असून या ॲपद्वारे प्रत्येक शेतकरी आपल्या मोबाइलमध्ये हवामानाची अद्ययावत माहिती मिळवू शकणार आहे. हवामान केंद्र स्थापित करण्याकरिता अतुल वानखडे, विशाल अढाऊ, विलास पडोळे यांनी विशेष प्रयत्न केले.
बॉक्स
स्वयंचलित हवामान केंद्रामुळे शेतकऱ्यांना भविष्यात होणाऱ्या हवामान बदलाची माहिती उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टळू शकेल, तसेच शेतीचे नियोजनसुद्धा करता येईल.
- हर्षवर्धन देशमुख, अध्यक्ष, श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती