शहरात आॅटोचालकांची बेशिस्त वाहतूक
By admin | Published: July 3, 2017 12:31 AM2017-07-03T00:31:53+5:302017-07-03T00:31:53+5:30
शहरात आॅटोचालकांच्या मनमानीने अमरावतीकर त्रस्त झाले आहेत. बेशिस्त वाहतुकीमुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे.
नागरिक त्रस्त : गुन्हेगारीचे वाढते प्रमाण, ग्रामीण भागातील आॅटोंचा सर्रास शिरकाव
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात आॅटोचालकांच्या मनमानीने अमरावतीकर त्रस्त झाले आहेत. बेशिस्त वाहतुकीमुळे जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहे. काही दिवसांत आॅटो चालकांचे गुन्हेगारीतील प्रमाण वाढत असल्याचे विविध घटनांवरून निदर्शनास येत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आॅटो चालकांच्या या कारभारावर अंकुश लावण्याचा प्रयत्न पोलीस व आरटीओमार्फत सुरू झाले आहे. नियमबाह्य पद्धतीने चालणाऱ्या आॅटोवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे.
शहरात पाच हजारांच्यावर आॅटोची संख्या आहे. मात्र, बहुतांश आॅटोचालक नियमबाह्य पद्धतीने वाहतूक करीत आहे. आॅटो थांबा असतानाही आॅटोचालक रस्त्यावरच वाहने उभे करून प्रवासी घेतात आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. त्यामुळे दररोज किरकोळ अपघातही वाढले आहेत. अतिक्षमतेचीवाहतूक, तर सर्रासपणे शहरात सुरू असल्यामुळे अपघातास आमंत्रण मिळत आहे.
वाहतूक शाखेचे व पोलीस ठाण्यातील पोलिसांसमोरच बेशिस्त वाहतूक होत आहे. मात्र, कोणतेही पोलीस आॅटोचालकांना हटकत नाहीत. प्रवाशांकडून मनमानी भाडे उकळून त्यांची पिळवणुुक करण्यात आॅटो चालकानी तर कळसच गाठला आहे. पॉवर हाऊसजवळील आॅटो चालक ट्रव्हल्स प्रवाशांना शहरात सोडण्यासाठी तब्बल २०० ते ३०० रुपये भाडे आकारतात. ही एकप्रकारे प्रवाशांची लूटच आहे. शहरात सर्वत्र आॅटोच-आॅटो दिसून येतात. यामध्ये विना परवाना व कालबाह्य आॅटोचेही अधिक प्रमाण वाढले आहे. खटारा व कालबाह्य आॅटोद्वारे वाहतूक करणे प्रवाशांच्या जीवावर बेतणारे ठरू शकते. केवळ पैसा कमविण्याच्या हेतूने हे आॅटोचालक प्रवासांच्या जीवाशी खेळत आहे.