शवविच्छेदन अहवालातून उलगडणार अल्पवयीन प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येचे गूढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:12 AM2021-05-24T04:12:19+5:302021-05-24T04:12:19+5:30
अमरावती : अल्पवयीन प्रेमीयुगुलाने महादेवखोरी नजीकच्या जंगलातील झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. यामागील कारण अद्याप ...
अमरावती : अल्पवयीन प्रेमीयुगुलाने महादेवखोरी नजीकच्या जंगलातील झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली होती. यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु नातेवाईकांच्या बयाणातून या आत्महत्येचे गूढ उलगडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
आतापर्यंत चार ते पाच नातेवाईकांचे बयाण नोंदविले असून, या प्रकरणात शवविच्छेदन अहवालसुद्धा महत्त्वाचा धागा ठरणार आहे. सोमवारी पोलिसांना दोघांचाही पीएम रिपोर्ट प्राप्त होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रेमीयुगुलाने जंगलातील उंच झाडावर दुपट्ट्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु जंगलातील अडचणीच्या ठिकाणी जाऊन झाडावर चढणे आणि एकाच दुप्पट्याने आत्महत्या करणे, ही संशय निर्माण करणारी बाब ठरत असल्याची चर्चा सध्या शहरात सुरू आहे. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतर ही आत्महत्या की, घातपात याबाबच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टिकोनातूनही पोलीस तपास करीत आहेत.
बॉक्स
मिसिंगपूर्वी मोबाईल घरीच
मुलगा राजापेठ ठाणे हद्दीतून, तर मुलगी फ्रेजरपुरा ठाणे हद्दीतून मिसिंग झाल्याच्या तक्रारी मुलांच्या आई- वडिलांनी पोलिसांकडे नोंदविल्या होत्या. या प्रकरणात १४ मे रोजी पोलिसांना तक्रार प्राप्त झाली. मात्र, घरून निघून जाण्यापूर्वी दोघांनीही आपापले मोबाईल घरीच ठेवले होते. म्हणून पोलिसांना अल्पवयीन मुलाचा व मुलीचा शोध घेताना अडचण निर्माण झाली. शुक्रवारी महादेवखोरीतील जंगलात झाडाला दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. प्रथमदर्शनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मात्र, दोघेही येथे पोहचले कसे? याचा शोध पोलीस घेत आहे. नातेवाईकांच्या बयाणातून काही पुढे आले असले तरी पोलिसांनी चौकशीचा भाग म्हणून ते गोपनीय ठेवले आहे.