निकड १४ हजार सीट्सची उपलब्धता केवळ १६१२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 09:51 PM2018-09-11T21:51:20+5:302018-09-11T21:52:00+5:30
केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे दर पन्नास व्यक्तीमागे एक याप्रमाणे सार्वजनिक स्वच्छतागृह असणे आवश्यक असताना, आठ लाख लोकसंख्येच्या शहरात अवघ्या १५४ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यात एकूण १६१२ सीट्स आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र शासनाच्या निकषाप्रमाणे दर पन्नास व्यक्तीमागे एक याप्रमाणे सार्वजनिक स्वच्छतागृह असणे आवश्यक असताना, आठ लाख लोकसंख्येच्या शहरात अवघ्या १५४ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यात एकूण १६१२ सीट्स आहेत. वर्तमान स्थितीतील स्वच्छतागृहांची संख्या पाहता, शहरात अदमासे १४३८८ सीट्सची आवश्यकता आहे. या दृष्टीने शहरात सार्वजिनक स्वच्छतागृहांची वानवा प्रकर्षाने समोर आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसल्याने महिलांची होणारी कुचंबणा अधोरेखित झाली आहे.
सर्व शहरे हगणदरीमुक्त आणि स्वच्छ राहण्याच्या उद्देशाने देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. वैयक्तिक स्वच्छतागृहांसह सार्वजनिक व सामुदायिक स्वच्छतागृहे उभारणीवर भर दिला जात आहे. त्यासाठी अमरावती महापालिकेला गतवर्षी तब्बल १९.३० कोटी रुपये मिळाले. नव्याने सामुदायिक व वैयक्तिक स्वच्छतागृहे बांधण्यात आली. मात्र, सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. आजमितीस जयस्तंभ वा गांधी चौक सोडल्यास शहराच्या मध्यवर्ती भागात एकही सार्वजनिक वा पे अँड यूज तत्त्वावर चालविले जाणारे स्वच्छतागृह नाही. बाजारहाट, नोकरी वा अन्य कामासाठी घराबाहेर पडलेल्या महिला वर्गाची कुचंबणा होते. बहुतांश व्यावसायिक संकुलांतही मुत्रीगृह व स्वच्छतागृह नाही. राजकमल, नमूना, चित्रा, बापट, श्याम व लगतच्या अन्य चौकांमध्ये खरेदीसाठी तोबा गर्दी असते. तखतमल इस्टेट व लगतच्या मार्केट महिला खरेदीदारांनी ओसंडून वाहतात. मात्र, त्या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने अनेक महिला महापालिकेतील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा आधार घेतात. व्यावसायिक संकुलातील दुकांनामध्ये सेल्सवूमन म्हणून काम करणाऱ्या महिला व तरुणीसुद्धा मोठ्या प्रमाणात महापालिकेत येतात.
पे अँड यूजची अवस्था बिकट
महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरात ठिकाणी ‘पे अँड यूज’ तत्त्वावर चालविले जाणारे १९ स्वच्छतागृहे आहेत. त्यातील जयस्तंभ चौक, गांधी चौक व राजापेठ बसस्थानकामागे असलेले स्वच्छतागृहे वगळता अन्य सार्वजनिक स्वच्छतागृहे नागरी वस्त्यांमध्ये आहेत. पे अँड यूज स्वच्छतागृहातील अस्वच्छता लक्षात घेता, नाक दाबून तेथे जाण्यास कुणीही महिला धजावत नाही. जयस्तंभ आणि गांधी चौकातील स्वच्छतागृहांमध्ये नेहमीच पाण्याचा प्रश्न बिकट असतो. उन्हाळ्यात या ठिकाणच्या बोअर कोरड्या पडल्याने तेथे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता.
असे आहेत निकष
शहर विस्तारात सार्वजनिक स्वच्छतेसारख्या अत्यावश्यक सेवांवर सातत्याने ताण येत आहे. स्वच्छतागृहांसाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार पन्नास व्यक्तींमागे एक सार्वजनिक स्वच्छतागृह असावे आणि दर अडीच ते तीन किलोमीटर अंतरात रस्त्याच्या दुतर्फा स्वच्छतागृह असावे, हा प्रमुख निकष आहे. मात्र, त्यानुसार स्वच्छतागृहे नसल्याची वस्तुस्थिती आहे.
राजकमल वा नमुना भागात कापड खरेदी करण्यास गेले असता, त्या भागात एकही स्वच्छतागृह नाही. महापालिकेने खासकरून महिलांच्या सुविधेसाठी स्वच्छतागृह उभारण्याची नितांत गरज आहे.
- साक्षी गवळी, गृहिणी