अमरावती विभागात रबीचे सरासरी क्षेत्र पार, यवतमाळ-बुलडाण्यात विक्रमी क्षेत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2018 06:17 PM2018-02-10T18:17:47+5:302018-02-10T18:18:13+5:30
विभागात यंदाचा रबी हंगाम ५ लाख ९३ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी १०६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक १४० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली
अमरावती : विभागात यंदाचा रबी हंगाम ५ लाख ९३ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी १०६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक १४० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली, तर वाशिम, अकोला जिल्हे माघारले आहेत. यंदाच्या हंगामात हरभ-याची सरासरीच्या तुलनेत १३३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. विभागात यंदाच्या रबी हंगामासाठी ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टर सरासरी क्षेत्र होते. सद्यस्थितीत ५ लाख ९३ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यंदा डिसेंबरपासून थंडी असल्याने विभागातील गव्हाची पेरणी लवकर आटोपल्याने रबीचा हंगाम १०६ टक्क्यांवर स्थिरावला आहे.
पावसाळ्यात सरासरीपेक्षा २६ टक्के पाऊस कमी झाल्याने जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पाण्याची पातळी जानेवारी महिन्यात चार मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याने सिंचन विहिरीतील पाणीदेखील कमी झाले. परिणामी अकोला व वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा पेरणी कमी झाली. सध्या बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १ लाख ३९ हजार ८०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ८९ हजार ४०० हेक्टर, अकोला जिल्ह्यात १ लाख ४ हजार २०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ९१ हजार १००, वाशिम जिल्ह्यात ९२ हजार ६०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६० हजार १००, अमरावती जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ९०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ४७ हजार ४०० व यवतमाळ जिल्ह्यात ७८ हजार सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ९ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे.
यंदा हरभ-याचा विक्रमी क्षेत्रात पेरा
यंदाच्या रबीमध्ये हरभºयासाठी ३ लाख ४२ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना प्रत्यक्षात ४ लाख ५५ हजार २०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी १३३ आहे. गव्हासाठी १ लाख ८० हजार ७०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना प्रत्यक्षात १ लाख १३ हजार ५०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी ६३ आहे. जवस, तीळ व तेलबियांचे क्षेत्र यंदा निरंक राहिले आहे.रबी ज्वारची ८० टक्के, तर करडईची १४ टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे.