सोयाबीनच्या सरासरी उत्पादकतेने पीक विमा बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 11:07 PM2017-12-01T23:07:01+5:302017-12-01T23:08:13+5:30

The average productivity of soybean inhibited crop insurance | सोयाबीनच्या सरासरी उत्पादकतेने पीक विमा बाधित

सोयाबीनच्या सरासरी उत्पादकतेने पीक विमा बाधित

Next
ठळक मुद्देउत्पादनखर्चही निघाला नाही : १६८ गावांतील पीक कापणी प्रयोगानंतरचे चित्र

लोकमत आॅनलाईन
अमरावती : यंदाचा खरीप हंगामातील सोयाबीन अपुऱ्या पावसामुळे उद्ध्वस्त झाले. यामधून बचावलेल्या सोयाबीनची परतीच्या पावसामुळे प्रतवारी खराब झाली. उत्पादनखर्चही निघाला नाही. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाद्वारा हेक्टरी ८.५ क्विंटल उत्पादकता काढल्याची माहिती आहे. हा अहवाल आयुक्तालय स्तरावर जाहीर होणार असला तरी या उत्पादकतेमुळे खरीप पीक विमा बाधित होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामात जिल्ह्यात सरासरी ३ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ८६ हजार ५६६ हेक्टर क्षेत्रात सोयबीनची पेरणी झाली. मात्र, सरासरीपेक्षा कमी पावसामुळे सोयाबीनची वाढ खुंटून कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला. यामधून जे सोयाबीन बचावले, ते परतीच्या पावसामुळे बाधित होऊन प्रतवारी खराब झाली. याचा कृषी विभागाद्वारा काढण्यात येणाऱ्या सरासरी पीक उत्पादकतेवर परिणाम झालेला नाही, असे पीक कापणी प्रयोगाअंती काढण्यात आलेल्या निष्कर्षात स्पष्ट झाले.
कृषी आयुक्तालयाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील एकूण गावांच्या २० टक्के म्हणजेच १६८ गावांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे सोयाबीनचे पीक कापणी प्रयोग काढण्यात आले. सबंधित ग्रामसेवक, कृषिसेवक व मंडळ अधिकारी यांनी संबंधित क्षेत्रात प्लॉट टाकून सवंगणी व मळणीच्या काळात निरीक्षण केले. या ३३६ पीक कापणी प्रयोगाअंती जिल्ह्यातील सोयाबीनची सरासरी उत्पादकता काढण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी साधारणपणे ८.५ क्विंटल आहे व हा अहवाल कृषी आयुक्तालयास पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर शासनस्तरावरून अहवाल विमा कंपनीस पाठविला जाईल. त्यामुळे सोयाबीनच्या नुकसानभरपाईसाठी विमा कंपनी कोणते निकष लावते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, या सर्व शासन निकषात शेतकरी भरडला जात असल्याचे वास्तव आहे.
पाच वर्षात रँडम पद्धतीने गावाची निवड
पीक कापणी प्रयोगासाठी जिल्ह्यातील एकून गावापैकी २० टक्के गावांची रँडम पद्धतीने कृषी विभागाद्वारा निवड करण्यात येते. म्हणजेच पाच वर्षात जिल्ह्यातील सर्वच गावांचा यामध्ये समावेश होतो. निवड झालेल्या गावातील संबंधित शेतामध्ये १० बाय १० मीटरचे प्लॉट टाकण्यात येऊन पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून तीन विभागाद्वारे सरासरी उत्पादकता काढण्यात येते व अहवाल कृषी आयुक्तालयास पाठवून तेथे जिल्हा, विभाग व राज्याची सरासरी उत्पादकता काढण्यात येते व विमा कंपनीसदेखील याची माहिती दिली जाते.
अवकाळीने प्रतवारी खराब, दरात फटका
यंदाच्या हंगामात पावसाच्या खंडामुळे सोयाबीनच्या शेंगा पोचट राहिल्या तसेच सवंगणी व मळणीच्या काळात अवकाळी पावसाने सोयाबीन डागी झाले. प्रतवारी खराब झाल्याने सोयाबीन ‘नाफेड’ केंद्रांवर नाकारले जात आहे, तर व्यापारी हमीभावापेक्षा एक हजारापेक्षा कमी दराने माल खरेदी करीत आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. पीक कापणी प्रयोगामध्ये फक्त उत्पादकता पाहिली जात असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे.

Web Title: The average productivity of soybean inhibited crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.