आवागड-माखला रस्ता उठला आदिवासींच्या जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2021 05:00 AM2021-10-11T05:00:00+5:302021-10-11T05:00:55+5:30
रस्त्यावर होणाऱ्या शेवाळ, मातीच्या थराने दुचाकीस्वाराचे घसरून अपघात होत आहेत. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याची आवक अचानक वाढल्याने रस्ता खरडून व वाहून गेला आहे. खरडलेल्या रस्त्यातून दुचाकीस्वार जीव धोक्यात टाकून प्रवास करीत आहेत. या अपघात होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यातील अतिदुर्गम माखला-आवागड रस्ता यावर्षी पावसाळ्यात जवळपास दोन किमीपर्यंत खचलेला होता. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणारा हा रस्ता पुन्हा परतीच्या पावसाने धोकादायक बनला आहे. रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहत आल्याने दरडीचे दगड रस्त्यावर आले आहेत. तीन पुलांखालून वाहणारे पाणी पाइप माती-दगडाने बंद झालेला आहे. परिणामी पुलावरून सतत पाणी वाहत आहे. त्यामुळे रस्त्यावर होणाऱ्या शेवाळ, मातीच्या थराने दुचाकीस्वाराचे घसरून अपघात होत आहेत.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याकडे जातीने लक्ष द्यावे, अशी मागणी या रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाण्याची आवक अचानक वाढल्याने रस्ता खरडून व वाहून गेला आहे. खरडलेल्या रस्त्यातून दुचाकीस्वार जीव धोक्यात टाकून प्रवास करीत आहेत. या अपघात होत आहेत.
नऊ गावातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग
अतिदुर्गम अशा भागातील येणारा हा रस्ता आठ ते नऊ गावांना एकमेकांशी तसेच तालुका मुख्यालय तथा प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडणारा आहे. हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. अतिवृष्टीने तालुक्यातील अनेक रस्ते पूर्णत: खराब झाले आहेत. माखला-आवागड रस्ता दुरुस्तीची मागणी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पीयूष मालवीय यांनी केली आहे. पालकमंत्री याविषयी सकारात्मक असल्या तरी व्याघ्र प्रकल्पामुळे कामात अडथळे येत आहेत.
महिनाभर बंद होता रस्ता
पावसाळा सुरू होताच माखला परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने हा रस्ता जवळपास एक महिना बंद होता. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या प्रयत्नाने तात्पुरती दुरुस्ती करून रस्ता पूर्ववत केला तरी तो कायमस्वरूपी न झाल्याने अपघाताला आमंत्रण देणारा ठरला आहे.
माखला-अवागड रस्ता तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे. व्याघ्र प्रकल्प आणि त्याचे जाचक नियम आदिवासींच्या जिवावर उठणारे ठरत आहेत. रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.
- पीयूष मालवीय,
उपाध्यक्ष, युवक कांग्रेस, मेळघाट