राज्यातील २२ पोलीस निरीक्षकांना औटघटकेच्या पदोन्नतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:35+5:302021-07-20T04:10:35+5:30
कॉमन प्रदीप भाकरे अमरावती : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या २२ पोलीस निरीक्षकांसह राज्यातील ४१४ पोलीस निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी १३ जुलै ...
कॉमन
प्रदीप भाकरे
अमरावती : सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या २२ पोलीस निरीक्षकांसह राज्यातील ४१४ पोलीस निरीक्षकांची सेवाज्येष्ठता यादी १३ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. त्यावर आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी अवघ्या दोन दिवसांची सवड देण्यात आली. त्या सर्व पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नतीची प्रतीक्षा लागून राहिली आहे. मात्र महिना, पाच महिन्यांवर निवृत्ती येऊन ठेपलेल्या २२ जणांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अन्य काही अधिकाऱ्यांप्रमाणे ‘आज पदोन्नती, उद्या निवृत्ती’ असे तर नाही ना होणार, अशी भीती त्यांना सतावत आहे.
राज्यातील निशस्त्र पोलीस निरीक्षकांना पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यासाठी सन २०२० / २१ ची निवड सूची तयार करण्यात येत आहे. त्या प्रक्रियेदरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांची २५ एप्रिल २००४ रोजीच्या स्थितीनुसार, तात्पुरती सेवाज्येष्ठता नव्याने सुधारित करून सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. त्यावर १५ जुलैपर्यंत अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापना) या कार्यालयास ई-मेलद्वारे आक्षेप वा निवेदन नोंदवायची होती. हरकती, आक्षेपानंतर यादीत असलेले ४१४ जण सेवाज्येष्ठतेनुसार, ते पुढील पदोन्नतीस पात्र ठरणार की कसे, हे निश्चित होणार आहे. मात्र, ती पदोन्नतीची यादी केव्हा, याकडे या ‘सिनिअर पीआय’चे लक्ष लागले आहे.
बॉक्स
दोघांची निवृत्ती ३१ जुलैला
सेवाज्येष्ठता यादीतील ४१४ पोलीस निरीक्षकांपैकी अमरावती
ग्रामीण व हिंगोली येथे कार्यरत दोन पोलीस निरीक्षक ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त होत आहेत. एसीपी, डीवायएसपी म्हणून निवृत्त होण्याची त्यांची इच्छा फलद्रूप होईल की कसे, हे तूर्तास तरी अनुत्तरित आहे. दहा दिवसांसाठी का होईना पदोन्नती मिळाल्यास सेवानिवृत्तीनंतर ‘लखलाभ’ होतात, हा खात्याचा अनुभव आहे.
बॉक्स
त्या १८ जणांना मिळणार का लाभ
४१४ पैकी २२ जण ३१ जुलै ते ३१ डिसेंबर या कालावधीत निवृत्त होत आहेत. यात ३१ जुुलै रोजी दोघे, ३१ ऑगस्ट रोजी सहा, ३० सप्टेंबर रोजी तीन, ३१ ऑक्टोबर रोजी दोन, ३० नोव्हेंबर रोजी दोन व ३१ डिसेंबर २०२१ रोजी एकूण सहा पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त होणार आहेत. निवृत्ती दिनांकापूर्वी पदोन्नती मिळावी, ही त्यांची अपेक्षा पाच सहा वर्षे राहिलेल्यांच्या तुलनेत अधिक नसावी काय?