आगीपासून बचावासाठी गावपातळीवर जागृती
By admin | Published: May 7, 2017 12:09 AM2017-05-07T00:09:56+5:302017-05-07T00:09:56+5:30
वाढत्या उष्णतामानामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या आगीपासून नागरिकांचा बचाव होणे,....
पालकमंत्र्यांचे निर्देश : युवकांचे सहकार्य घेणार
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वाढत्या उष्णतामानामुळे आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या आगीपासून नागरिकांचा बचाव होणे, प्राणहानी व वित्तहाणी टाळण्यासाठी प्रत्येक गावात जनजागृती करण्याचे निर्देश जिल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.
महामार्गावर दुतर्फा झाडे जाळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शहरातदेखील वृक्षतोड होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश ना. प्रवीण पोटे यांनी दिले आहेत. घराभोवती, झाडालगत किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळू नये. असा प्रकार करताना कोणी नागरिक आढळल्यास त्याचे विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यानी दिले.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सर्व मुख्याधिकारी यांनी जनतेमध्ये जागृती करावी, ग्रामीण भागात लागनाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवीन्यासाठी स्थानिक युवकांचे सहकार्य घ्यावे असे पालकमंत्र्यानी सूचित केले आहे. जिल्ह्यात कोठेही आगीची घटना घडल्यास १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध करावी याविषयी भारत विकास गु्रपच्या जिल्हा समन्वयकांना त्यांनी आदेश दिले आहेत.
अशी घ्यावी काळजी, प्रशासनाच्या सूचना
घरासमोर किंवा झाडाजवळ, गुरांच्या गोठ्याजवळ कचरा जाळू नये.
स्वत:च्या कपड्याला आग लागल्यास जमिनीवर लोळून विझवावी.
सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडू नये, धुऱ्यावर जाळ करताना काळजी घ्या.
जुन्या विजेची तार व जुनी विजेची उपकरणे बदलावी.
घरात सार्वजनिक ठिकाणी संकटकालीन बाहेर पडण्याचा मार्ग असावा.
घरातील हिटर, गॅसपासून कपडे, पडदे, लाकडी वस्तू ३ फूट लांब ठेवाव्या.
सिलिंडरचे रेग्यूलेटर बंद ठेवावे, चुलीतील विस्तव विझल्याची खात्री करावी.
आग लागल्यास अग्निशमन दलाचा टोल फ्री क्र. १०१ व कार्यालय क्रमांक ०७२१-२५७६४२४ व सर्व नगरपरिषद येथील क्रमांकावर फोन करावा.