‘गावागावांसी जागवा, भेदभाव समूळ मिटवा’
By admin | Published: April 30, 2017 12:10 AM2017-04-30T00:10:32+5:302017-04-30T00:10:32+5:30
ग्रामोत्थानाच्या दृष्टीने सर्वांगीण ग्रामविकासाची सूत्रबद्ध, आदर्श ग्राम संकल्पनाच्या योजना ग्रामगीतेसारख्या आमुलाग्र परिवर्तनाच्या दिशेने झेपावणाऱ्या चिंतनशील,...
ग्रामोत्थानाच्या दृष्टीने सर्वांगीण ग्रामविकासाची सूत्रबद्ध, आदर्श ग्राम संकल्पनाच्या योजना ग्रामगीतेसारख्या आमुलाग्र परिवर्तनाच्या दिशेने झेपावणाऱ्या चिंतनशील, संवेदनशील महाकाव्यातून ४१ विषय विधायक, क्रियात्मक स्वरुपात प्रगट करणाऱ्या युगमानव, द्रष्टापुरुष राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस ‘ग्रामजयंती’ म्हणून ३० एप्रिल २०१७ ला संपूर्ण भारतभर गावागावांतून विधायक कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात येत आहे.
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा जन्मदिवस राष्ट्रसंतांनी संस्थापित केलेल्या अखिल भारतीय श्रीगुरूदेव सेवामंडळाच्या प्रचारक, कार्यकर्ते व त्यांच्या प्रेमीजनांनी साजरा करण्याचे सूतोवाच राष्ट्रसंतांसमोर केले. तेव्हा मार्मिकपणे राष्ट्रसंतांनी आपल्या भावना मोकळ्या मनाने सर्वांसमोर मांडल्या. राष्ट्रसंत म्हणाले -
‘‘मित्रांनो! तुकडोजींची जयंती साजरी करण्याची प्रथा मला अमलात आणू द्यायची नाही. माझा जन्मदिवस साजरा करण्याचे हे नवे खूळ मंडळाने निर्माण करणे म्हणजे माझे मरण चिंतनेच होय. मी आपणाला आधी सांगून मनात मानव मात्राचे उत्थान करणारी देवता शोधत होतो. यादृष्टीने विचार करू लागलो तेव्हा मानवजातीच्या कल्याणाचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीने ‘ग्रामदेवता’ ही मला योग्य वाटली. मला गावा-गावात विठ्ठल रखुमाईचे दर्शन होत आहे. मुले-बाळे पुंडलिकांच्या रुपात दिसताहेत. ग्रामस्थांच्या वेदनांचे संवेदन मी प्रत्यक्ष अनुभवित आहे. अशा माझ्या ग्रामदेवतेला मी सेवेचे फूल वाहिलेले आहे. मंदिरात आता देव राहिलेला नसून तो घराघरांतून, झोपड्या-झोपड्यांतून काय घडत आहे, हे पाहण्यासाठी निघाला आहे. ह्याच विशाल भावनेने मी माझ्या जन्म दिवसाला ग्रामजयंती म्हटले आहे. ग्रामजयंती ही देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचली पाहिजे असा माझा मानस आहे, असा राष्ट्रसंतांचा विचार आहे.’’ ग्रामोत्थानाच दीर्घचिंतन नव्या युगाच्या नवनिर्मितीचे स्वप्न उराशी बाळगून एक नवा मंत्र ग्रामजयंतीच्या निमित्ताने देशाला दिला.
‘‘अनेक फळाफुलांनी बगीचा सजलेला दिसावा, तसा हा ग्रामजयंती मास महापुरुषांच्या जयंतीने सजलेला दिसतो. रामनवमी, हनुमान जयंती, महावीर जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, शिवजयंती व ग्रामजयंती या एप्रिल महिन्यात येते. विविध जयंतीच्या निमित्ताने गावागावांत अनेक ठिकाणी उत्सव होतात. या सर्व उत्सवांनाही ग्रामोन्नतीचे रुप देता आले पाहिजे.’’ हा उदात्त विचार राष्ट्रसंतांनी द्रष्टेपणाने मांडला. नुसत्या सर्व पुढाऱ्यांच्या व धर्मांच्या संत महंतांना हार पुष्पे वाहून व चार भाषणे झोडून त्यांची महत्ता गाण्यापेक्षा ‘हाती उद्योगाचे साधन, मुखी रामनामाचे चिंतन’ केले तरच त्या दिव्यपुरुषाची जयंती केल्याचे समाधान गावांना मिळू शकेल. याचा प्रात्यक्षिक प्रयोगसुद्धा वं. राष्ट्रसंतांनी तिसरा गांधी स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्रातील निबीड अरण्यात वसलेल्या भंडारा जिल्ह्यातील पवनजवळील आमगाव येथे केला.
ग्रामसेना उभारून करावे ग्रामरक्षण
‘ग्रामजयंती’ म्हणजे गावात राहणाऱ्या सर्व लोकांची जयंती आहे असं समजून आपण काम केलं पाहिजे. खेड्यांची उन्नती म्हणजेच महापुरूषांची खरी जयंती होय हा नवसंदेश राष्ट्रसंतांनी ग्रामजयंतीच्या निमित्ताने ह्या भारतभूमीला दिला. गावच जर रसातळाला गेलं, त्याचीच जर दुर्दशा झाली, खेडीच जर उद्धवस्त झाली तर देशच संपला म्हणून समजा. ग्रामीण वर्ग आज अज्ञानाच्या खोल गर्तेत पहुडला आहे. राष्ट्रसंतांच्या हे दृष्य दृष्टीस होते. म्हणूनच अंधश्रद्धांच्या आहारी गेलेल्या या भोळ्या समाजाला बाहेर काढण्याचं व दीशा देण्याचं कार्य राष्ट्रसंतांनी गावागावात जाऊन केलं. समाजमन जागविताना त्यांनी ग्रामरक्षणाची जबाबदारी ग्रामसेना उभारून सर्वप्रथम पार पाडली, असे अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे माजी उपसर्वाधिकारी रूपराव वाघ यांनी सांगितले.