जिल्हा परिषदेत दुजाभाव पशुपालकांद्वारा पुरस्कार परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 11:37 PM2018-02-20T23:37:12+5:302018-02-20T23:38:21+5:30
झेडपीच्या पशुसंवर्धन विभागाद्वारा पशुपालकांशी दुजाभाव करण्यात येतो. ठिकठिकाणच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पशुंना वैद्यकीय सेवाही वेळेत मिळत नसल्याने पशू दगावत आहेत.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : झेडपीच्या पशुसंवर्धन विभागाद्वारा पशुपालकांशी दुजाभाव करण्यात येतो. ठिकठिकाणच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात पशुंना वैद्यकीय सेवाही वेळेत मिळत नसल्याने पशू दगावत आहेत. याच्या निषेधार्थ चांदूरबाजार तालुक्यातील पशुपालकांनी त्यांना आजवर मिळालेले पुरस्कार मंगळवारी विभागीय आयुक्तांना परत केल्याने एकच खळबळ उडाली.
चांदूरबाजार तालुक्यात स्वदेशी गोवंशाची डेअरी चालविणाऱ्या पंकज मिश्रा, कांताप्रसाद मिश्रा, सोनिया मिश्रा, इमरान खान, जीवन देशमुख, योगेश देशमुख, मनीष गणेशपुरे, नरेंद्र निर्मळ या पशुपालकांनी कैफियत सीईओ के.एम. अहमद व विभागीय आयुक्त पीयूषसींग यांचे केली व त्यांना आजवर पशुपालक म्हणून मिळालेले सर्व पुरस्कार परत केले.
‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई केव्हा?
अनेक गावातील पशुवैद्यकीय रुग्णालय बंद राहतात. त्यामुळे पशुंना वेळेवर उपचार मिळत नाहीत. उपचाराअभाावी अनेक पशुंचा दुर्देवाने मृत्यू झाला आहे. पशुवैद्यकीय अधिकारीदेखील मुख्यालयी राहत नाहीत. ते केवळ कागदोपत्री रुग्णालयात राहत असल्याचा आरोप यावेळी पशुपालकांनी केला. यासर्व पशुसंवर्धन अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.
पशुुप्रदर्शनीतही पशुपालकांशी भेदभाव
जिल्ह्यात अनेक ठिकाणी पशुप्रदर्शनी आयोजित केली जाते. याठिकाणी एकदा सहभागी पशुपालकांना पुन्हा पात्र असतानाही बक्षीस नाकारला जात असल्याची खंत पशुपालकांनी व्यक्त केली. वास्तविकता हा जिल्हा परिषदेचा हा निर्णय शासन धोरणाच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
पशुप्रदर्शनीत पुरस्काराची पुनरावत्ती होऊ नये व स्थानिकांनाही प्राधान्य मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्र्धन समितीचा समितीचा ठराव आहे. तसेच यासंदर्भात बहुसदस्यीय निवड समिती आहे. त्यानुसारच धोरणात्मक निर्णय घेतले जातात.
- डॉ. विजय राहाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद