शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवकांचे पुरस्कार बारगळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:17 AM2021-09-10T04:17:48+5:302021-09-10T04:17:48+5:30
अमरावती : कोरोना परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारे विविध पुरस्कार गत दोन वर्षापासून बारगळले आहेत. ...
अमरावती : कोरोना परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षापासून जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारे विविध पुरस्कार गत दोन वर्षापासून बारगळले आहेत. यामुळे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवकांच्या पाठीवर पडणारी कौतुकाची थापच बंद झाली आहे.
जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव पुरस्काराने करण्यात येतो. या पुरस्काराला समाजात मोठा मान असल्याने या पुरस्काराच्या अपेक्षेने अनेकांकडून चांगली काम होत असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पुरस्कारच बंद झाल्याने जॉब चार्ट सोडून अधिक होणारे काम थांबत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेकडून दरवर्षी शेती उत्पादक उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येतो. याशिवाय जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांनाही सन्मानित करण्यात येते. सोबतच अंगणवाडी सेविकांचाही गौरव करण्यात येतो. याशिवाय ग्रामविकासात महत्त्वाचा दुवा असलेल्या ग्रामसेवकांनाही उत्कृष्ट ग्रामसेवक म्हणून आदर्श पुरस्कारांनी जिल्हा परिषदेतर्फे सन्मानित करण्यात येते. परंतु, कोरोनाच्या संसर्गामुळे गत दोन वर्षापासून शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवकांचे पुरस्काराचे वितरण झालेले नाही. त्यामुळे या पुरस्काराच्या इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान, या पुरस्कारासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
प्रस्तावानंतरची प्रक्रिया प्रलंबित
कोरोना संसर्ग लक्षाात घेता निर्बध लागू केले आहेत. परिणामी गेल्या दोन वर्षांत जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात येणारे विविध पुरस्कार बारगळले आहेत. कोरोना नियमांच्या अधीन राहून प्रत्येक विभागातील पुरस्कार वितरण कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यासाठी संबंधित विभागाकडून पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार अनेकांनी प्रस्तावही दाखल केले आहेत. त्यापुढील प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे.