सोशल मीडियावर म्हणी, उखान्यामधून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:12 AM2021-03-06T04:12:12+5:302021-03-06T04:12:12+5:30
चांदूर बाजार : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने देश व राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आले होते. यामुळे जनजीवन ...
चांदूर बाजार : कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने देश व राज्यांमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आले होते. यामुळे जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना मंदावलेल्या कोरोनाने पुन्हा झपाट्याने डोके वर काढले आहे. यामुळे जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. याकरिता सोशल मीडियावर वेगवेगळ्या म्हणी व उखाणे यांच्या माध्यमातून एकमेकांना पोस्ट शेअर करत खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन शासन-प्रशासन करतच आहे. सर्वसामान्य नागरिकांनी खबरदारी घ्यावी, यासाठी सोशल मीडियावर म्हणी व उखाणेच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. तसेच नागरिकांनी खबरदारी घेण्याचा उपाय म्हणून मास्क व सॅनिटायझर वापरण्याचे आवाहन नेटकर्यातर्फे करण्यात येत आहे.
कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बुडाले. अनेक बेरोजगार झाले. काहींना तर आजही रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे. अशी परिस्थितीत पुन्हा नागरिकांवर येऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपली जबाबदारी ओळखून काळजी घ्यावी. सध्या काही बेफिकर नागरिकांमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जसा जसा वाढत आहे, तस तसे सामान्य नागरिकांना पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आपणच आपली काळजी घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेतून सोशल मीडियावर शेअर केली जात आहे.
असा आहे सोशल ट्रेंड
‘हंड्यावर हंडे सात, त्यावर मांडली परात, कोरोनाला हरवायला बसा आपापल्या घरात’, ‘मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर, सगळ्यांनी मास्क घालूनच पळा घराबाहेर’, ‘शंकराच्या पिंडीवर बेलाची पान ठेवते वाकून, रोजचे व्यवहार करा सोशल डिस्टंसिंग ठेवून’, ‘ताजमहल कुतुब मिनार बनवणारे कारागीर होते ग्रेट, लक्षण दिसले कोरोनाचे तर डॉक्टरांना भेटा थेट’, चिमणीला म्हणतात चिऊ, कावळ्याला म्हणतात काऊ, आपणच घरी रहा विनाकारण नका घराबाहेर जाऊ’, ‘चांदीच्या ताटात ठेवले सफरचंदाचे काप, डॉक्टरांना त्वरित भेटा आला जरी ताप. या म्हणींमधून काही सोशल कर्मी विविध मॅसेज सोशल मीडियावर टाकत आहे.