सीपींनी सांभाळली आक्रोश मोर्चाची धुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 05:00 AM2019-12-31T05:00:00+5:302019-12-31T05:00:28+5:30
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध सभा व मोर्चाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी बंदोबस्ताची धुरा सांभाळली. वलगाव मार्गातील डिप्टी ग्राऊंड ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याने हा आक्रोश मोर्चा शांततेत पार पडला.
अमरावती : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध सभा व मोर्चाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी बंदोबस्ताची धुरा सांभाळली. वलगाव मार्गातील डिप्टी ग्राऊंड ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गात पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आल्याने हा आक्रोश मोर्चा शांततेत पार पडला.
मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी असे एकूण ६०० जण रस्त्यावर पहारा देत होते. याशिवाय अतिरिक्त स्ट्रायकिंग फोर्स, आरसीपी प्लाटूनसुद्धा ठिकठिकाणी सज्ज करण्यात आली होती. मोर्चादरम्यान पोलिसांनी वाहतूक नियंत्रणाची विशेष काळजी घेतली. मोर्चाचे व्हिडीओ चित्रीकरण, उंच इमारतीवरून दुर्बिणीने नागरिकांवर लक्ष ठेवले तसेच साध्या पोषाखात एटीसी आणि विशेष शाखेचे पोलीस मोर्चात तैनात होते. या बंदोबस्तासाठी पोलीस सर्व्हिस रिव्हॉल्व्हर, वॉकी-टॉकी, ढाल, लाठी, हेल्मेट, गॅस गन, रबर बुलेटसह गन, पीए सिस्टीम तसेच आवश्यक ते साहित्य घेऊन हजर होते.
फिक्स पॉर्इंटची जबाबदारी
नागपुरी गेटचे पोलीस निरीक्षक यांनी नागपुरी गेट ते गर्ल्स हायस्कूल चौकापर्यंत फिक्स पॉइंटची जबाबदारी सांभाळली. यासाठी १५ पोलीस उपनिरीक्षक आणि ९० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.
सहा पोलीस निरीक्षकांच्या नेत्तृत्वात पाच एपीआय व पीएसआय आणि ५२ पोलीस शिपाई मोर्चाच्या बंदोबस्तासाठी रस्त्यावर तैनात करण्यात आले होते. मोर्चात सहभागी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत त्यांनी सुरक्षा दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयापुढे बॅरिकेडिंग
जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा अडविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी असा एकूण १४९ पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. बॅरिकेडिंग करून मोर्चेकऱ्यांना तेथे थांबविण्यात आले. यामध्ये चार पोलीस निरीक्षक, नऊ सहायक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक, १२३ पोलीस शिपाई आणि १३ महिला पोलिसांचा सहभाग होता.
सभास्थळाला पोलिसांचा घेराव
डिप्टी ग्राऊंड येथील सभास्थळाच्या बंदोबस्ताची धुरा पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर यांनी सांभाळली. पाच पोलीस निरीक्षक, सात उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक, ९४ शिपाई अशा पोलीस ताफ्याने सभास्थळाला सुरक्षा पुरविली. याशिवाय आरसीपी व क्यूआरटीचे एक-एक पथकही तैनात होते.