मोजक्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोरोना नियंत्रणाची धुरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:13 AM2021-05-12T04:13:27+5:302021-05-12T04:13:27+5:30
मारोती पाटणकर/चुरणी चुरणी : चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत. मोजक्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोरोना नियंत्रणाची ...
मारोती पाटणकर/चुरणी
चुरणी : चिखलदरा तालुक्यातील काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत. मोजक्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर कोरोना नियंत्रणाची धुरा असल्याने इतर आजारांच्या उपचाराबाबत कुणालाही सवड नाही. त्यामुळे संलग्न गावांतील आरोग्य सेवा कोलमडली आहे.
काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ४४ गावे व ४० हजारांवर लोकसंख्या आहे. एकूण दहा उपकेंद्रे, फिरत्या पथकाचे दोन दवाखाने आहेत. या ठिकाणी नऊ समुदायक अधिकारी व एक वैद्यकीय अधिकारी आहे. गट ‘ब’ वैद्यकीय अधिकारी चारपैकी दोन आहेत. आरोग्य सेविकांची १२ पदे मंजूर असताना, सहा कार्यरत आहे. कत्रांटी आरोग्य सेविकेचे एक पद रिक्त आहे. आरोग्य सेवकाची सात पदे व एक आरोग्य सहायकाचे पद रिक्त आहे. आशाचे एक व परिचराची सात पदे रिक्त आहेत. अंगणवाडी सेविकेचेही एक पद रिक्त आहे. एकूण २६ रिक्त आहेत. खारी येथे मागील पाच वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी नाही. योग्य उपचाराअभावी आदिवासींना मध्य प्रदेशातील बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे लागतात. त्यामुळे प्राणाशी गाठ असते. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन पदभरतीसाठी पाठपुरावा करावा, अशी आदिवासी नागरिकांची मागणी आहे.
हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात पदे रिक्त
हतरू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गट ‘ब’, आरोग्य सहायक, परिचराची तीन, सलिता उपकेंद्रात आरोग्य सेविका तसेच एकताई उपकेंद्रात परिचराचे एक पद रिक्त आहे.
-------------------------
हतरू व काटकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय वेगाने वाढत आहे. त्याप्रमाणात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची पदे कमी आहेत. ही पदे भरणे आवश्यक आहे. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे.
- सुमीत चावरे, जिल्हा सचिव, भाजयुमो