बीए, बीकॉमचा निकाल लांबणीवर
By admin | Published: June 30, 2017 12:26 AM2017-06-30T00:26:08+5:302017-06-30T00:26:08+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा बी.ए., बी.कॉम भाग १ अभ्यासक्रमाचा निकाल लांबणीवर पडला आहे.
विद्यार्थी संख्यावाढीचा परिणाम : द्वितीय सत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा बी.ए., बी.कॉम भाग १ अभ्यासक्रमाचा निकाल लांबणीवर पडला आहे. इयत्ता १२ वीनंतर प्रवेशीत विद्यार्थ्यांची अतिरिक्त संख्या वाढल्याने परीक्षा विभागावर ताण पडून निकाल लांबत असल्याबाबतचा दुजोरा परीक्षा विभागाने दिला आहे.
विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षा आटोपल्यानंतर त्या अभ्यासक्रमांचा निकाल ४५ दिवसांच्या आत लागणे अपेक्षित आहे. मात्र, बी.ए., बी.कॉम., बी.एस.सी., भाग १ या अभ्यासक्रमांच्या परीक्षा आटोपून कधीचाच ५० दिवसांचा कालावधी लोटला आहे. निकाल लागत नसल्याने महाविद्यालयांनी द्वितीय सत्राचे अभ्यासक्रम वर्ग सुरू केले नाही. तसेच महाविद्यालयांमध्ये संभ्रम कायम आहे. परंतु परीक्षा विभागाने प्राचार्यांना पत्र पाठवून बी.ए., बी.कॉम भाग १ या अभ्यासक्रमांचे द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू करावे, असे आवाहन केले आहे. बी.ए., बी.कॉम भाग १ अभ्यासक्रमांसाठी एटीकेटी लागू असल्याने द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना आपसूकच प्रवेश दिला जातो. त्यामुळे बी.ए., बी.कॉम भाग १ च्या अभ्यासक्रमांचे निकाल तांत्रिक कारणांमुळे लांबणीवर पडत असले, तरी द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमांचे वर्ग, शिकवणी थांबू नये, प्राचार्यांना कळविल्याची माहिती परीक्षा विभागाचे संचालक जयंत वडते यांनी दिली. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या आदेशानुसार याच येत्या आठवड्याभरात त्वरेने निकाल लावण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. बी.ए., बी.कॉम. भाग ३ चा निकाल लावण्यात आला आहे. अनुदानित प्राध्यापकांच्या भरोशावरच उत्तर पत्रिकांचे मूल्यांकन करावे लागते. बी.ए., बी.कॉम भाग १ अभ्यासक्रमाला अतिरिक्त विद्यार्थी प्रवेशित संख्या दरवर्षाला वाढत आहे. मात्र मूल्यांकन करणारे प्राध्यापक वर्गाची संख्या तितकीच आहे. त्यामुळे निकालावर परिणाम होत आहे. उन्हाळी परीक्षांचे निकाल किमान आठ दिवस लांबतील, असे विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.