महाविकास आघाडीचे नियाेजन चुकले; अपक्ष आमदारांना बदनाम करून चालणार नाही : बच्चू कडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 11:47 AM2022-06-13T11:47:55+5:302022-06-13T11:48:15+5:30
अपक्ष आमदारांना दोष देऊन चालणार नाही. मोठ्या पक्षांचे नियंत्रण नव्हते. मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय अपक्ष आमदार फुटू शकत नाही. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या वक्तव्याची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.
अमरावती : राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांनी रान पेटले आहे. मात्र, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नियोजन चुकल्यामुळेच पराभव झाला. आता अपक्ष आमदारांना बदनाम करून चालणार नाही, ही बाब राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अथवा शिवसेनेने चारही उमेदवारांच्या मतदानाचा कोटा निश्चित केला नाही. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी आपली चूल सुरक्षित राहावी, एवढेच नियोजन केले. पहिल्या, दुसऱ्या मतांचा कोटा न ठरविल्याने नियोजन चुकले आणि शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाचा सामना करावा लागला, असे कडू म्हणाले.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांनी दगाफटका केल्याच्या आराेपाबाबत कडू म्हणाले, अपक्ष आमदारांना दोष देऊन चालणार नाही. मोठ्या पक्षांचे नियंत्रण नव्हते. मोठ्या नेत्यांचे पाठबळ असल्याशिवाय अपक्ष आमदार फुटू शकत नाही. संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांवर केलेल्या वक्तव्याची चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.
शरद पवारांचा नेमका निशाणा कुठे?
शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर कौतुक केल्याविषयी कडू म्हणाले की, हा विषय कौतुक करण्यासारखा नाही. स्वत:चे नियोजन चुकीचे करायचे आणि दुसऱ्याला विजय मिळाला की कौतुक करायचे, हे योग्य नाही. शरद पवार हे कौतुक करताना त्यांचा नेमका निशाणा कुठे असते, हे सांगता येत नाही. होऊ शकते भविष्यात त्यांना वेगळ्या पद्धतीने जायचे असेल, अशी ना. कडू यांनी शेलकी लगावली.
निवडणूक म्हटले की घोडेबाजार आलाच
निवडणूक कोणतीही असू द्या, यात घोडेबाजार आलाच. राज्याला घोडेबाजार हा शब्द वेगळा वाटत असला तरी प्रत्येक निवडणुकीत ते होते. आम्ही निवडणुकीत मतांचा जोगवा मागावयास जातो, तेव्हा काहीजण वेगवेगळ्या पद्धतीने कामांची मागणी, अट घालतात. त्यामुळे अशा निवडणुकीत गरीब, सामान्य नेतृत्व उमेदवार म्हणून राहू शकत नाही. त्यासाठी मतदान प्रक्रियेवर आवर घालण्यासाठी कठोर पावले उचलणे काळाची गरज झाली, असे ते म्हणाले.