...तर राज्यसभेसाठी शेवटच्या पाच मिनिटात मतदान करू, बच्चू कडूंचा ठाकरे सरकारला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 03:31 PM2022-06-06T15:31:42+5:302022-06-06T17:01:44+5:30
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडले आहे.
अमरावती : राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवरुन वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून ते आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून धान खरेदी सुरू करावी. अन्यथा आम्ही राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाबाबतचा निर्णय शेवटच्या पाच मिनिटांमध्ये घेऊ, अशा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
येत्या १० जून रोजी राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. सहाव्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेने या जागेसाठी संजय पवार यांना उतरवले असून भाजपकडून धनंजय महाडिक हे रिंगणात आहेत. ही जागा निवडून आणण्यात अपक्ष आमदारांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र, अशातच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धान आणि हरभऱ्याच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला कोंडीत पकडले आहे.
राज्यात हरभरा उत्पादकांची संख्या एक लाख व धान उत्पादकांची संख्या चार ते पाच लाख इतकी आहे. परंतु, आता केंद्र सरकार माल खरेदी करण्यासाठी तयार नसल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारने धान खरेदी केली नाही तर एका हेक्टरला चार हजार रूपये मदत हरभरा आणि धान उत्पादकांना द्यायला हवा. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली पाहिजे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तातडीने हालचाली कराव्यात, असे बच्चू कडू म्हणाले. पण जर या मागणीकेड दुर्लक्ष केलं तर राज्यसभेचे मतदान हे शेवटच्या पाच मिनिटात करू असा इशाराही बच्चू कडू यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
आशिष जयस्वाल यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा
शिवसेना समर्थक आमदार आशिष जयस्वाल यांनी राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सावधानतेचा इशारा दिला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री अपक्ष आमदारांना निधी देताना टक्केवारी मागतात. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता नसली तरी भविष्यात राज्य सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात, असे आशिष जयस्वाल यांनी म्हटले. त्यानंतर आता बच्चू कडूंनी देखील सरकारला इशारा दिला आहे.