बच्चू कडू यांना हवे सामाजिक न्याय मंत्रालय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 07:02 PM2022-07-06T19:02:24+5:302022-07-06T19:03:05+5:30
Amravati News महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घरठाव केल्यानंतर आता त्यांची नजर सामाजिक न्याय व अपंग कल्याण मंत्रालयावर आहे.
अमरावती : महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेले बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत घरठाव केल्यानंतर आता त्यांची नजर सामाजिक न्याय व अपंग कल्याण मंत्रालयावर आहे. मंगळवारी अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी तसे संकेतही दिले आहेत.
कॅबिनेट मंत्री किंवा विशिष्ट खात्याचा आपण आग्रह धरला नसला तरी अपंगांच्या सेवेसाठी सामाजिक न्याय विभागाची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. रुग्ण आणि अपंगांची सेवा हाच समाजकार्याचा पिंड असल्याने आपण राजकारणात आलो. सामाजिक न्याय विभागाची संधी मिळाल्यास जनसेवेचा हा रथ अधिक जोमाने हाकता येईल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला.
चांदूर बाजार तालुका प्रहार जनशक्ती पक्षाकडून आयोजित कार्यक्रमात त्यांनी गेल्या १५ दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर प्रकाश टाकला. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा जेव्हा आठ खासदारांच्या बळावर देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, तर भविष्यात प्रहारचा मुख्यमंत्री का होऊ शकत नाही, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आपण एकनाथ शिंदे यांच्यामुळेच महाविकास आघाडीत सामील झालो होतो. त्यामुळे आताही आपण त्यांच्यासोबतच आहोत. शिवसेनेतील गटबाजीमुळे उद्धव ठाकरे यांचे जहाज बुडताना दिसत होते. तेव्हा सेनेसह अपक्ष आमदारांनी शिंदे यांना साथ दिली. त्यामुळेच शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले, असेही ते म्हणाले.