बच्चू कडू सचिन तेंडुलकरच्या मागे हात धुवून लागणार; दोन दिवसांत वकीलामार्फत नोटीस बजावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 09:53 AM2023-08-28T09:53:51+5:302023-08-28T09:54:28+5:30
आशा सेविकांना जबरदस्ती कोणीही ऑनलाइन कामाची सक्ती केल्यास संबधित अधिकाऱ्याला झोडपून काढू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.
माजी मंत्री बच्चू कडू आता प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरच्या मागे हात धुवून लागणार आहेत. आज कडू यांनी याची माहिती दिली आहे. 30 ऑगस्टला कडू त्यांच्या वकिलाकरवी तेंडुलकरला कायदेशीर नोटीस पाठविणार आहेत.
ऑनलाईन गेमची जाहिरात करणं मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर याला भोवणार असल्याची चिन्हे आहेत. ऑनलाईन गेमची जाहिरात सचिन तेंडुलकरने केल्यामुळे आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. ही जाहिरात केल्याबद्दल सचिन तेंडुलकर यांना 30 तारखेला वकीला मार्फत कायदेशीर नोटीस बजावणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.
भारतरत्नांनी कुठली जाहिरात करावी, कुठली नाही याची आचारसंहिता आहे. त्यामुळे आता तेंडुलकरला वकिलामार्फत नोटीस पाठवल्यानंतर आंदोलनाची घोषणा करू, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली.
आशा सेविकांना आरोग्य विभागाकडून ऑनलाईन काम करण्यासाठी सक्ती करुन कामावरुन कमी करण्याची धमकी अधिकारी वर्गाकडून देण्यात येत आहे. परंतु या आशा सेविकांना मिळणाारे मानधन हे तुटपुंज्या स्वरूपाचे असून त्यांच्याकडे इतरही अनेक कामे आहेत. अशा परिस्थितीमध्ये ऑनलाइन काम कसे करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार बच्चू कडू यांच्या वेरूळ पूर्णा येथील घरी जाऊन आशा सेविकांनी आमदार बच्चू कडूंना त्यांना राखी बांधत आपली समस्या मांडली होती. यावेळी बच्चू कडू यांनी तातडीने संबधित अधिकाऱ्यांना फोन लावून संपर्क साधला. आशा सेविकांना जबरदस्ती कोणीही ऑनलाइन कामाची सक्ती केल्यास संबधित अधिकाऱ्याला झोडपून काढू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.