बच्चू कडू यांच्यावर गुन्हा, सदनिका खरेदीची माहिती शपथपत्रात लपविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 05:02 AM2017-12-29T05:02:28+5:302017-12-29T05:02:31+5:30
अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन सादर करताना शपथपत्रात सदनिका खरेदी केल्याची माहिती लपविल्याप्रकरणी आसेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला
चांदूर बाजार (अमरावती) : अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन सादर करताना शपथपत्रात सदनिका खरेदी केल्याची माहिती लपविल्याप्रकरणी आसेगाव पोलीस ठाण्यात गुरुवारी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. चांदूर बाजार नगरपालिकेतील नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे.
आ. बच्चू कडू यांनी १९ एप्रिल २०११ रोजी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, वर्सोवा येथील शासनाचे विनियम १३ (२)अंतर्गत राजयोग गृहनिर्माण सहकारी संस्थेस मंजूर केलेल्या इमारत क्रमांक २८ गाळा क्रमांक ३०३ राजयोग गृहनिर्माण सहकारी संस्थेचे सदस्य म्हणून स्वीकृती दर्शविली. ४२ लाख ४६ हजार शपथपत्राद्वारे जमा करून सदनिका खरेदी करून ताबा घेतला. परंतु, ही माहिती निवडणूक अधिका-यांपासून लपविल्याचा आरोप नगरसेवक तिरमारे यांनी केला आहे. गाडगे महाराजांचा आदर्श ठेवणारे आमदार बच्चू कडू यांनी केलेले कृत्य लाजिरवाणे आहे. आमदारकी रद्द व्हावी, यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे तिरमारे यांनी सांगितले.