अमरावतीच्या नेहरू मैदानात 'मै झुकेगा नही' वेधतेय लक्ष; बच्चू कडू यांची शक्ती प्रदर्शनाची तयारी
By गणेश वासनिक | Published: November 1, 2022 01:20 PM2022-11-01T13:20:30+5:302022-11-01T13:28:23+5:30
या मेळाव्यात बच्चू कडू नेमकं काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.
अमरावती : खोके आणि किराणा वाटपावरून गत आठवड्यात आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या झालेला वाद काही अंशी शमला. मात्र बच्चू कडू यांनी जशास तसे उत्तर देण्यासाठी अमरावतीच्या नेहरू मैदानावर मंगळवारी कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित केला आहे. त्याकरिता राज्यभरातून प्रहारचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.
रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा, बच्चू कडू यांच्यात मनोमिलन झाले. रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली व्यक्त केली. मात्र 'खोके' हा शब्द आमदार बच्चू कडू यांचे जिव्हारी लागला असून यासंदर्भात प्रहारचे कार्यकर्ते अंतिम निर्णय घेतील, असा निर्धार त्यांनी केला आहे. त्या अनुषंगाने अमरावतीच्या नेहरू मैदानावर आज प्रहारचा मेळाला आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी बच्चू कडू हे सरकारमध्ये राहायचे की बाहेर पडायचे किंवा तटस्थ राहायचे याविषयी निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.
मेळाव्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते, पदाधिकारी गोळा होत आहेत. दुपारी २ च्या मेळाव्याला आमदार बच्चू कडू मार्गदर्शन करतील. मात्र टाऊन हॉल परिसरात बच्चू कडू यांचे लागलेले पोस्टर अनेकांचे लक्ष वेधत आहे. त्यावर मै झुकेगा नही' कॅश लाईन असून प्रशासनाने देखील त्याची दखल घेतली आहे. त्यामुळे या मेळाव्यात बच्चू कडू नेमकं काय बोलतात सर्वांच लक्ष लागलं आहे.
आमदार रवी राणा यांचे निवासस्थान, कार्यालयावर पोलीस बंदोबस्त
आमदार बच्चू कडू यांनी नेहरू मैदान येथे आयोजित केलेल्या प्रहारच्या मेळाव्याच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने आमदार रवी राणा यांचे 'गंगासावित्री' निवासस्थानी आणि राजापेठ उडाण पूला जवळील युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. राजापेठ व शहर कोतवालीचे पोलीस प्रशासन बच्चू कडू यांचा मेळावा आणि रवी राणा यांच्या निवासस्थान, कार्यालयाची सुरक्षा हाताळत आहेत.