परतवाड्यात सुवर्णकारांचा चक्काजाम
By admin | Published: March 29, 2016 12:13 AM2016-03-29T00:13:20+5:302016-03-29T00:13:20+5:30
केंद्र शासनाने सोन्यावर एक टक्का एक्साईज ड्युटी लावल्याच्या निषेधार्थ व मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी ...
परतवाडा : केंद्र शासनाने सोन्यावर एक टक्का एक्साईज ड्युटी लावल्याच्या निषेधार्थ व मागे घेण्याच्या मागणीसाठी सोमवारी परतवाडा-अचलपूर शहरातील सराफा व्यावसायिकांनी सकाळी ११ वाजता चांदूरबाजार नाक्यावर चक्काजाम आंदोलन केले.
केंद्र शासनाने १ मार्चपासून सोन्यावर एक टक्का एक्साईज ड्युटी लावली आहे. परिणामी याला देशभरातील सराफा व्यावसायिक संघटनेच्यावतीने तीव्र विरोध दर्शविला आहे. मागील २६ दिवसापासून सराफा व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. त्यामुळे सुवर्णकार कारागीरांवर उपासमारीची वेळ आली आहे. तर लग्नसराईचे दिवस पाहता सुवर्णकारांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. ग्राहकांची बंद मुळे गैरसोय होत आहे. एक्साईज ड्युटी लावल्यामुळे सराफा व्यवसायावर इन्पेक्टर राज सुरू होवून व्यावसायिकावर दबावतंत्राचा वापर होण्याची भीती निर्माण झाल्याचे आपल्या निवेदनातून सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. सोमवारी परतवाडा-अमरावती महामार्गावरील चांदूरबाजार नाका येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये अध्यक्ष मनीष अग्रवाल, उपाध्यक्ष सुरेंद्र भन्साली, सचिव दिवाकरराव किटुकले, एकता ज्वेलर्सचे राजेश अटलजी, नीलेश मांडळे आदी उपस्थित होते.